मुंबई(रमेश औताडे) : महिलांविरोधातील लैंगिक हिंसाचाराला कायदेशीर संरक्षण देणारा वैवाहिक बलात्कार अपवाद भारतीय दंड विधानातून हटवावा, या ठाम मागणीसाठी रेड डॉट फाउंडेशनच्या वतीने बुधवारी मुंबईतील ऐतिहासिक रॉयल ऑपेरा हाऊस येथे जगातील सर्वात लांब साडी असलेल्या ‘द इन्फिनिट साडी’ या वैश्विक जनजागृती उपक्रमाचे भव्य अनावरण करण्यात आले.
प्रसिद्ध फॅशन डिझायनर निवेदिता साबू यांनी डिझाइन केलेली ही साडी केवळ वस्त्र नसून, ती महिलांच्या वेदना, संघर्ष आणि न्यायाच्या मागणीचे प्रभावी प्रतीक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. भारतासह जगभरातून आलेल्या हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या या साडीवर गोवण्यात आल्या असून, प्रत्येक स्वाक्षरी ही वैवाहिक बलात्काराला गुन्हा म्हणून मान्यता देण्याची सामूहिक मागणी व्यक्त करत आहे.
कार्यक्रमास अभिनेता व लिंगाधारित हिंसाचार निर्मूलनासाठीचे राजदूत राहुल भट, रेड डॉट फाउंडेशनचे सहसंस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सुप्रीत के. सिंग, तसेच डिझायनर निवेदिता साबू यांची प्रमुख उपस्थिती होती.
यानंतर आयोजित “The Saree Never Ends: Weaving a Call for Justice” या फायरसाईड पॅनल चर्चेत वैवाहिक बलात्काराच्या कायदेशीर व सामाजिक परिणामांवर सखोल चर्चा झाली. या चर्चेत मजलिसच्या संचालिका ॲड. ऑड्री डी’मेलो, सर्वोच्च न्यायालयाच्या ज्येष्ठ वकील ॲड. एम. एस. नप्पिनाई, तसेच टीइडीएक्स वक्त्या व उद्योजिका झारिया पटनी यांनी आपली मते मांडली.
वैवाहिक नात्यात संमतीला दुय्यम स्थान दिले जाणे हे महिलांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचे वक्त्यांनी स्पष्ट केले. कायद्यातील पोकळीमुळे असंख्य महिला न्यायापासून वंचित राहात असल्याने, समाज व शासनाने तातडीने भूमिका घ्यावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
‘द इन्फिनिट साडी’चे अनावरण हा केवळ एक कलात्मक क्षण नसून, तो पीडित महिलांच्या आवाजाला बळ देणारा, एकजुटीचा आणि कायदेशीर सुधारणेची निकड अधोरेखित करणारा ऐतिहासिक क्षण ठरला, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



