ताज्या बातम्या

अजितदादा पवार राज्यपालांना ओळख करुन देतात तेव्हा…!

प्रतिनिधी : महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, सुप्रसिध्द व्याख्याते, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांचा सपत्नीक सत्कार व ‘यशवंत’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा कार्यक्रम सातारा येथे सोमवार दि. 8 मे, 2023 रोजी दुपारी 3.00 वाजता स्व.यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा मध्यवर्ती बॅंक सातारा येथे आयोजित केला होता. प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे विद्यार्थी उत्कर्ष प्रतिष्ठान तासगांव, तळमावले, सातारा व संस्कृती प्रकाशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या भव्य दिव्य कार्यक्रमाच्या नियोजनाचा एक भाग मी होतो याचा मला अभिमान आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार येणार होते. अजितदादांना भेट देण्यासाठी मी त्यांचे स्केच आणले होते. संपूर्ण कार्यक्रम संपल्यानंतर मी सातारा पत्रकार संघाने अध्यक्ष, दै.पुढारीचे निवासी संपादक, मित्रवर्य हरीष पाटणे (सर) यांना ते देण्याची विनंती केली. मी दिलेल्या स्केचचे कौतुक करत त्यांनी आपल्या शैलीत मला दाद दिली. या कौतुकाने मी मोहरुन गेलो. यावेळी डॉ.यशवंत पाटणे आणि आ.मकरंद पाटील यांचीही स्केचेस दिली. अजितदादा पवार यांच्यासमवेत घडलेला माझा प्रत्यक्ष संपर्क एवढाच. यानंतर माझा त्यांच्याशी दुरान्व्येही संपर्क आला नाही.
दरम्यान, मला महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाला त्याचे वितरण रविवार दि.29 सप्टेंबर, 2024 रोजी नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडिया डोम, वरळी मुंबई येथे होते. या कार्यक्रमाला आमच्या संपूर्ण कुटूंबियांना शासकीय निमंत्रण होते. सलग तीन वर्षाचे कृषी पुरस्कार असल्याने पुरस्कार्थींची संख्या जास्त होती. त्यामुळे कार्यक्रमाचे वेळेचे नियोजन खूप काटेकोर होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मंत्रीमंडळातील अन्य सदस्य यांच्या उपस्थितीत राहणार होते. यातील काही मान्यवरांना मी स्केचेस भेट दिली होती. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना 15,000 वी कलाकृती द्यायची होती.
कार्यक्रम सुरु असताना मी राज्यपालांच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटला. एकंदरित कार्यक्रमाचे नियोजन पाहता तो त्यांना देता येईल का नाही याची मला शंका होती. तरी देखील मनाचा निश्चय करत पुरस्कारासाठी माझे नाव पुकारल्यानंतर पत्नीसह मी व्यासपीठावर गेलो. जाताना मी अक्षरगणेशा तिच्याजवळ दिला होता. पुरस्कार घेतल्यानंतर पुरस्काराचे साहित्य मी तिच्याकडे देवून ते चित्र घेतले.
याचवेळी सुत्रसंचालकांकडून दुसऱ्या पुरस्कार्थींना व्यासपीठावर आमंत्रित केले. एवढया वेळात मी ते चित्र उपमुख्यमंत्री अजितदादांना दाखवले व ते राज्यपालांना देण्यासाठी विनंती केली. वेळेच्या अभावाने स्टेजवरील कृषी विभागाचे अधिकारी मला तिथून बाहेर काढण्यासाठी हात लावत होते. तोच दादांनी ते चित्र माझ्याकडून घेतले आणि अजितदादा राज्यपाल महोदयांना म्हणाले, ‘‘साहेब, हा उत्कृष्ट चित्रकार आहे, त्याने माझेही चित्र रेखाटले होते.’’ असे म्हणत त्यांनी राज्यपालांसमवेत माझा फोटोही काढायला लावला. या प्रसंगाने मी भारावून गेलो. आम्ही पुढे गेल्यानंतर दादांनी राज्यपालांना त्या अक्षरगणेशाची माहिती दिली. त्यावेळी त्या चित्राकडे पाहत राज्यपालांनी भक्तीभावाने हात जोडले. हा प्रसंग माझ्यासोबत कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले सुनील पवार (चाफळ), वर्गमित्र जनार्दन सुतार यांनी अचूक टिपला. या प्रसंगांची चर्चा मी कितीतरी वेळा केली. सातारा येथील कार्यक्रमाताील साधारण दोन मिनिटांची चित्रभेट अजितदादांनी अचूक लक्षात ठेवली होती. कित्येक दिवसांच्या कालावधीनंतर त्यांनी ती भेट अचूक लक्षात ठेवली होती. अजितदादांच्या या अफाट स्मरणशक्तीचे मला कौतुक वाटले. आणि कलाकारांना ते देत असलेल्या वागणूकीची जाणीव झाली.
बुधवार दि.28 जानेवारी, 2026 रोजी अजितदादा पवार यांच्या अकाली एक्झिट ची बातमी कानावर पडली आणि मन सुन्न झाले. अजितदादांच्या समवेतचे हे दोन काही मिनिटांचे क्षण डोळयांसमोर तरळून गेले. अजितदादा पवार कलाकारांचे मनापासून, मनमोकळे कौतुक करतात हे या प्रसंगावरुन दिसून आले. अशा प्रकारचे क्षण आयुष्यात कलाकारांना नवीन कलाकृती, नवीन काम करण्याची उर्जा आणि प्रेरणा देतात हे नक्की.

– डाॅ.संदीप डाकवे, पाटण

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top