कराड(प्रताप भणगे) : सातारा जिल्हा परिषद व कराड पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत एकूण 36 जागांसाठी तब्बल 184 उमेदवार रिंगणात उतरले असून सर्वच गटांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.
जिल्हा परिषद – 12 गट
जिल्हा परिषद अंतर्गत पाल, उंब्रज, मसूर, कोपर्डे हवेली, सैदापूर, वारुंजी, तांबवे, विंग, कार्वे, रेठरे बुद्रुक, काले व येळगाव या 12 गटांमध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय समाज पक्ष तसेच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत.
पंचायत समिती – 24 गण
पाल ते येळगावपर्यंतच्या 107 ते 130 क्रमांकाच्या 24 पंचायत समिती गणांमध्ये सत्ताधारी व विरोधी पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही मोठ्या संख्येने उमेदवारी दाखल केली आहे. अनेक गणांमध्ये त्रिकोणी व चौरंगी लढतीमुळे निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.
राजकीय प्रतिष्ठेची लढाई
या निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस यांच्यासह स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, प्रचाराला वेग आला आहे. येत्या मतदानात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



