ताज्या बातम्या

ओंकार अंध केव्हीके सोसायटीतर्फे १ नोव्हेंबरला ४,५०० दृष्टिहीन व्यक्तींना दिवाळी भेटवस्तूंचे वाटप

मुंबई( शांताराम गुडेकर ) : ओंकार अंध केव्हीके सोसायटीतर्फे ३८व्या वार्षिक भेटवस्तू वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घाटकोपर (पूर्व) येथील गणेश मंदिराजवळ, पॉप्युलर हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यानात पार पडणार आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ४,५०० हून अधिक दृष्टिहीन व्यक्तींना दिवाळीनिमित्त भेटवस्तू, अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू आणि गिफ्ट हॅम्पर्सचे वाटप करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमात ४५ दृष्टिहीन जोडप्यांचा विवाह सोहळाही आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्थानिक आमदार पराग शहा यांच्यासह विभागातील व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित राहणार आहेत. हा उपक्रम ओंकार अंध केव्हीके सोसायटी आणि प्रभाग क्रमांक १३० चे नगरसेवक धर्मेश भूपत गिरी यांच्या पुढाकारातून संपन्न होत आहे.दृष्टिहीन व्यक्तींच्या जीवनात आनंद, सन्मान आणि आपुलकी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. मानवता, समानता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात नागरिकांनी कुटुंबीय व मित्रपरिवारासह सहभागी होऊन सहकार्य करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Scroll to Top