मुंबई- पावसाळा सुरू होण्याआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी नोटीस घाटकोपरमध्ये डोंगरउतारावर थोकादायक स्थितीत राहणाऱ्या ४०० कुटुंबांना ‘एन’ वॉर्ड ऑफिसकडून बजावण्यात आल्या आहेत.पावसाळ्यात या ठिकाणी कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडल्यास पालिका प्रशासन जबाबदार राहणार नाही, असा इशाराही पालिकेने या नोटिशीद्वारे दिला आहे.
मुंबईत पूर्व उपनगरात दरडी आणि डोंगराळ भाग सर्वाधिक आहे. यामध्ये अतिवृष्टीत वारंवार दरडी कोसळून जीवित अथवा वित्तहानीचा धोका असतो. डोंगरउतारावरील या झोपड्या जिल्हाधिकारी किंवा इतर प्राधिकरणांच्या अखत्यारीत येतात. या ठिकाणी धोकादायक ठिकाणी राहत असल्यामुळे शेकडो रहिवाशांचा जीव धोक्यात आहे. त्यामुळे या झोपडपट्टीवासीयांनी पावसाळ्याआधी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.असे नोटिसद्वारे कळवले आहे.
धोकादायक ठिकाणांमध्ये ‘एन’ विभाग घाटकोपर हद्दीतील विक्रोळी पार्कसाईट,विक्रोळी (पश्चिम) आणि घाटकोपर (पश्चिम) भागातील वर्षानगर, रामनगर,संजय गांधी नगर, राहुल नगर, गणेश नगर, खंडोबा टेकडी, आझाद नगर, सोनिया गांधी नगर, प्रेम नगर व आनंद नगर या ठिकाणी डोंगराळ परिसरात झोपडपट्टय़ांचा समावेश आहे. याठिकाणी अतिवृष्टीत दरडी कोसळणे डोंगरावरून वाहत येणार्या पाण्याच्या प्रवाहामुळे भूस्खलन होऊन घरांची पडझड होणे, तसेच नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे स्थलांतर न करता तेथेच राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांची स्वतःची असेल. जीवित-वित्तहानीला पालिका जबाबदार नाही, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.