मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाअंतर्गत सुका कचरा वर्गीकरण विषयावर कार्यरत असलेल्या संगम प्रतिष्ठान या संस्थेचे पदाधिकारी तेलंगणा राज्यातील मुलगु जिल्ह्यातील मेदाराम या आदिवासी भागात सुरू असलेल्या सामाक्का–सारक्का यात्रेच्या निमित्ताने गेल्या दहा दिवसांपासून सक्रियपणे कार्यरत आहेत.
या यात्रेसाठी येणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या सेवेसोबतच वेस्ट मॅनेजमेंट संदर्भात जनजागृती, तसेच पेट बॉटल कलेक्शन ड्राइव्ह राबविण्यात येत असून, ही मोहीम कोका-कोला बेव्हरेजेसच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पडत आहे. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत कचरा व्यवस्थापनाबाबत शिस्त निर्माण करण्याचा प्रयत्न संगम प्रतिष्ठानने केला आहे.
या उपक्रमाची स्थानिक प्रशासनासह आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांनीही दखल घेतली असून, आज दिनांक २४ जानेवारी रोजी संध्याकाळी तेलंगणा राज्याच्या पंचायत राज, ग्रामीण जलनियोजन तसेच महिला व बालकल्याण कॅबिनेट मंत्री मा. श्रीमती धनश्री अनुसया ऊर्फ सीताक्का यांनी संगम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.
यावेळी संस्थेच्या सचिव अॅडव्होकेट कोमल तानाजी घाग, रंगनाथ नाडर, राधिका कारेकर तसेच खजिनदार पृथा तानाजी घाग यांचे मंत्री सीताक्का यांनी विशेष अभिनंदन केले. यात्रेच्या काळात पुढाकार घेऊन पर्यावरणपूरक जनजागृती व कचरा व्यवस्थापनाचे कार्य केल्याबद्दल त्यांनी संगम प्रतिष्ठानचे आभार मानले.
सामाजिक बांधिलकी जपत, श्रद्धा आणि स्वच्छता यांचा सुंदर समन्वय साधणारा हा उपक्रम इतर धार्मिक यात्रांसाठीही आदर्श ठरेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.




