
सातारा(अजित जगताप) : आदर्श गाव निढळ तालुका खटाव येथील सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक श्री दीपक भुजबळ यांनी वयाच्या ५८ व्या वर्षी५८ वे रक्तदान करून इतिहास घडवला आहे.
कोंडवे तालुका सातारा येथील दीपक भुजबळ गुरुजींची आई कैलासवासी सौ जयश्री शंकरराव भुजबळ यांच्या आठव्या पुण्यतिथीनिमित्त स्मरणार्थ हे रक्तदान केले आहे .आपल्या बुद्धी सोबतच शारीरिक क्षमतेचे ही दर्शन घडवले आहे. याबद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे मनापासून कौतुक केले आहे.
शिक्षण क्षेत्राचा वारसा लाभलेल्या दिपक शंकरराव भुजबळ गुरुजी यांचे आजोबा विठ्ठल भुजबळ, वडील श्री शंकरराव भुजबळ आणि स्वतः दीपक भुजबळ यांनी सुद्धा शिक्षक म्हणून एक पिढी घडवली होती. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा वारसा जपणारे श्री भुजबळ घराण्याची चौथी पिढी उच्च शिक्षण घेऊन सामाजिक कार्यामध्ये स्वतःला झोकून देत आहे.
. शाहूपुरी, कोंडवे ,हामदाबाज, म्हाते खुर्द, ठोंबरेवाडी, गाढवली, बामणोली ,आणि सध्या निढळ या ठिकाणी त्यांनी 37 वर्ष सेवा बजावली. .
१९८५ साली त्यांनी पहिले रक्तदान केले. आणि नेमके ४० वर्षांनी त्यांनी ५८व्या वर्षी ५८ वे स्वतः रक्तदान केले. पत्नी सौ . कांचन दिपक भुजबळ आणि मुलगा ओमकार भुजबळ, कन्या कुमारी क्रांती भुजबळ यांनी मरणोत्तर देहदान करून आपल्या देहाचाही उपयोग समाजासाठी व्हावा. असे सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून साक्षरता प्रसार, साक्षरता वारी अशा उपक्रमामध्येही ते सहभागी होत आहेत.
स्वच्छ सुंदर प्राथमिक शाळा करण्यासाठी त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन शाळा स्वच्छ करण्याची मोहीम राबवली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे समजून ते प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपण सुद्धा करत आहेत. त्यांच्या या कार्याचा अनेक संस्थेने गौरव केला आहे.
गोरगरिबांच्या मुलांना मोफत लाईफ जॅकेट देऊन त्यांना पोहण्यास शिकवले. आज अनेक मुलं, मुली राष्ट्रीय खेळाडू म्हणून तसेच लष्करामध्ये सेवा बजावत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज – फुले- शाहू- आंबेडकर विचाराचा वारसा जपणाऱ्या गुरुजन श्री दीपक भुजबळ यांनी खऱ्या अर्थाने बहुजन समाजामध्ये रक्तदान व मरणोत्तर देहदान दीप ज्योत पेटवला आहे. त्यांची भावजय सौ अरुणा किरण भुजबळ या शिक्षण विभागातील एस. सी. इ. आर. टी. सहाय्यक संचालक म्हणून पुणे येथे कार्यरत आहेत. श्री भुजबळ यांच्या या यशामध्ये त्यांच्या कुटुंबीयांचा खूप मोठा वाटा आहे त्याबद्दल त्यांनी कुटुंबीयांना ही धन्यवाद दिले आहेत. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
——————————
फोटो– श्री दिपक शंकरराव भुजबळ गुरुजी रक्तदान करताना (छाया – अजित जगताप, सातारा)




