कराड : वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत शेड्युल-१ (भाग E) मध्ये समाविष्ट असलेला तसेच IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर नेचर कन्झर्वेशन) यांनी अत्यंत संकटग्रस्त घोषित करून रेड डाटा लिस्टमध्ये समाविष्ट केलेल्या बो-माऊथ गिटारफिश या दुर्मिळ माशाची कराड परिसरात बेकायदेशीर शिकार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कराड येथील अमीर दस्तगीर नदाफ (रा. मलकापूर, कराड) व सातारा येथील ओमकार राजेंद्र मेळवणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांनी सदर माशाचा व्हिडिओ प्रसारित करून तसेच त्याचे सार्वजनिक प्रदर्शन केल्याची गुप्त माहिती वनविभागास मिळाली. त्या आधारे संबंधित दोघांविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई मा. उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव, वनक्षेत्रपाल ललिता पाटील, संदीप जोपाळे, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल आनंद जगताप, सुनिल शिंदे, वनरक्षक कैलास सानप, अभिजीत शेळके, अक्षय पाटील व मुकेश राऊळकर यांनी सहभाग घेतला.
वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, संरक्षित व दुर्मिळ प्रजातींची शिकार, वाहतूक किंवा प्रदर्शन करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांची माहिती तात्काळ वनविभागास द्यावी.



