मुंबई : मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्यावतीने सन २०२५ या वर्षासाठी देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारांची घोषणा मंगळवारी करण्यात आली. पत्रकार दिनाचे औचित्य साधून जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांना प्रतिष्ठेचा ‘कृ. पां. सामक’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार (वृत्तपत्र) पुरस्कारासाठी लोकसत्ता चे प्रतिनिधी अशोक अडसूळ यांची निवड करण्यात आली आहे. तर वृत्तवाहिनी विभागात राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार इंडिया टुडे-आज तक ग्रुपचे पुणे ब्युरो चीफ ओमकार वाबळे यांना जाहीर झाला आहे. वार्ताहर संघाच्या सदस्यांसाठी असलेला उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार अॅग्रोवन चे प्रतिनिधी बाळासाहेब पाटील यांना देण्यात येणार आहे.
६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे आणि सरचिटणीस दीपक भातुसे यांनी ही घोषणा केली. निवड समितीत अभय देशपांडे, प्रकाश सावंत आणि सदस्य सचिव सुजित महामुलकर यांचा समावेश होता. त्यांच्या शिफारशींना संघाच्या कार्यकारिणीने मान्यता दिली.
यापूर्वी ‘कृ. पां. सामक’ जीवनगौरव पुरस्कार वसंत देशपांडे, विनायक बेटावदकर, विजय वैद्य, दिनू रणदिवे, दिनकर रायकर, प्रकाश जोशी, अजय वैद्य, प्रतिमा जोशी आणि पंढरीनाथ सावंत यांना प्रदान करण्यात आला आहे. यंदाच्या पुरस्कारांचे वितरण लवकरच समारंभपूर्वक करण्यात येणार असून, संघाच्या वतीने सर्व पुरस्कारार्थींचे अभिनंदन करण्यात आले आहे.



