
मुंबई – धारावी वॉर्ड क्रमांक १८४ (ओबीसी) मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यांच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेनेचे माजी नगरसेवक वसंत नकाशे यांच्या धर्मपत्नी सौ. वर्षा वसंत नकाशे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
मुंबईत सध्या ‘ठाकरे ब्रँड’ची जोरदार चर्चा असून, दोन्ही भाऊ एकत्र आल्याने महापौर मराठीच होणार, अशा चर्चांमध्ये धारावीत वसंत नकाशे यांची “आपला माणूस” अशी ओळख अधिक ठळक झाली आहे. कोरोना काळात प्रभाग समिती अध्यक्ष असताना स्वच्छतागृहांची स्वच्छता, घराघरांत अन्नधान्य किट्सचे वितरण, रुग्णालयीन मदत अशी व्यापक सेवा त्यांनी स्वतःच्या खर्चाने दिली. त्यामुळे ते आजही “वसंत आप्पा” म्हणून सर्वत्र परिचित आहेत.
या वॉर्डमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक बब्बू खान यांच्या धर्मपत्नी तसेच शिंदे गटाचे प्रवीण जैन यांच्या धर्मपत्नी मैदानात असल्याने तिरंगी लढत अटळ मानली जात आहे. मराठी व मुस्लिम मतदारांचे मिश्र स्वरूप असलेल्या या वॉर्डमध्ये विजय कमी फरकाने ठरण्याची शक्यता असली, तरी नकाशे कुटुंबाचा दांडगा जनसंपर्क आणि कामाचा ठसा हा वर्षा नकाशे यांच्या बाजूने निर्णायक ठरू शकतो, असा सूर स्थानिकांमध्ये आहे. उमेदवारी अर्ज भरताना मोठ्या प्रमाणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, महाराष्ट्र नवनिर्माण सेना तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




