मुंबई – मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपर एन वॉर्ड क्रमांक १२५ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यावतीने हरिश्चंद्र जंगम यांनी आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात आणि शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत दाखल केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, हरिश्चंद्र जंगम यांच्यावर प्रेम करणाऱ्या विविध सेवाभावी व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सहकार क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि विश्वासाचे वातावरण पाहायला मिळाले.
अनुभवी नेतृत्व म्हणून हरिश्चंद्र जंगम यांच्याकडे सर्वसामान्य जनता आशेने पाहत आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक गरजू कुटुंबांना आर्थिक मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी जपली होती. त्यांची स्वतःची पतसंस्था असून, त्या माध्यमातून गोरगरीब व गरजू लोकांना वेळोवेळी मदत करणे हेच त्यांचे प्रमुख उद्दिष्ट राहिले आहे.
मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रदीर्घ काळ नोकरी केल्यानंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांनी पूर्णवेळ सामाजिक सेवेला प्राधान्य दिले. या काळात त्यांनी केलेल्या विविध सामाजिक, आर्थिक व सहकार क्षेत्रातील कामांचीच पोचपावती म्हणजे आज त्यांना मिळालेली उमेदवारी असल्याचे बोलले जात आहे.
घाटकोपर पूर्वेकडील महात्मा फुले नगर परिसरातून हरिश्चंद्र जंगम हे शंभर टक्के निवडून येतील, असा विश्वास यावेळी उपस्थित नागरिकांनी व्यक्त केला. त्यांच्या अनुभव, समाजाशी असलेली नाळ आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे वॉर्ड १२५ मधील निवडणूक लढत अधिकच लक्षवेधी ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.




