नवी मुंबई – नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधून अपक्ष उमेदवार श्री. संजय किसन सावंत यांनी अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा अर्ज युवा नेते संजय आंबुळकर (बापू) तसेच युवा उद्योजक बाबा शेठ बोत्रे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दाखल करण्यात आला.
अर्ज दाखल करताना परिसरातील नागरिक, युवक, महिला, सामाजिक कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी संपूर्ण परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. “राजकारण नव्हे, तर प्रामाणिक जनसेवा” हे ध्येय समोर ठेवून आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचे संजय सावंत यांनी यावेळी सांगितले.
घणसोली प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सेवा, शिक्षण तसेच महिला व युवकांच्या समस्या या प्रमुख मुद्द्यांवर ठोस आणि वेळेत उपाययोजना करण्यात येतील, असा विश्वास त्यांनी नागरिकांना दिला. स्थानिक विकासकामांमध्ये पारदर्शकता, नागरिकांचा थेट सहभाग आणि प्रशासनावर जबाबदारीची पकड ठेवणे हेच आपल्या कार्यपद्धतीचे मुख्य सूत्र राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी मार्गदर्शन करताना युवा नेते संजय आंबुळकर (बापू) म्हणाले, “नवी मुंबईच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमा आणि जनतेशी नाळ जोडलेले नेतृत्व आवश्यक आहे. संजय सावंत हे प्रभागातील प्रत्येक घटकाचा आवाज बनतील, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”
तर युवा उद्योजक बाबा शेठ बोत्रे यांनी, “समाजासाठी काम करण्याची तळमळ आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेले उमेदवार पुढे यावेत, यासाठीच आम्ही संजय सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत,” असे मत व्यक्त केले.
अपक्ष उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक ९ ‘ड’ मधील निवडणूक लढत अधिकच चुरशीची होणार असून, स्थानिक प्रश्नांवर थेट काम करणाऱ्या आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विश्वासावर उभ्या राहिलेल्या संजय किसन सावंत यांच्या उमेदवारीकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधले जात आहे. आगामी प्रचारात विकास, पारदर्शकता आणि जनसेवाच केंद्रबिंदू राहणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.




