
म

ुंबई – मुंबई महानगरपालिका निवडणुकीत वॉर्ड क्रमांक १८७ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचे अधिकृत उमेदवार श्री. जोसेफ दादा कोळी यांनी आज जल्लोषात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. निशाणी मशाल असलेल्या या उमेदवारीमुळे धारावी कोळीवाड्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, अनेक वर्षांनंतर कोळी समाजाला त्यांचा “हक्काचा नगरसेवक” मिळणार असल्याचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर झळकत होता.
सुमारे ३५ ते ४० वर्षांनंतर, स्वर्गीय रामकृष्ण केनी यांच्यानंतर पुन्हा एकदा कोळी समाजाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून उमेदवारी मिळाल्याने या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कितीही विरोधी उमेदवार मैदानात असले, तरी या वॉर्डमधून विजयाचा पताका फडकवण्याचा निर्धार कोळी बांधवांसह वॉर्डातील अनेक रहिवाशांनी व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत धारावी पुनर्विकासाचा मुद्दा केंद्रस्थानी राहणार आहे. ज्यांचे हे मूळ गाव आहे, त्या स्थानिक भूमिपुत्रांना डावलून शिवसेना–भाजपा सरकारकडून होत असलेल्या कथित अन्यायाविरोधात कोळी समाज एकवटल्याचे चित्र दिसत आहे. “आमच्यातलाच माणूस, आमच्यासाठी आवाज उठवणारा प्रतिनिधी हवा,” ही भावना यावेळी ठळकपणे व्यक्त होत आहे.
जोसेफ दादा कोळी यांना मिळालेली उमेदवारी हीच कोळी समाजाच्या हक्काच्या नेतृत्वाची साक्ष देणारी असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. महापालिकेत कोळीवाड्याचा, स्थानिकांचा आणि भूमिपुत्रांचा आवाज बुलंदपणे मांडला जाईल, याबाबत कोणतीही शंका नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
आज जोसेफ दादा कोळी यांनी ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक वाद्यांच्या निनादात आणि कोळी बांधवांच्या पारंपरिक वेशात वॉर्ड क्रमांक १८७ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा क्षण कोळी समाजासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरल्याची भावना संपूर्ण परिसरात दिसून आली.




