पुणे : भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभ परिसरात होणाऱ्या वार्षिक विजयस्तंभ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर शहर व ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल लागू करण्यात आले आहेत. पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलीस यांनी ३१ डिसेंबर ते १ जानेवारी २०२६ या कालावधीत विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.
या कालावधीत चाकण–शिक्रापूर–शिरूर मार्गे जाणाऱ्या सर्व जड व अवजड वाहनांना प्रवेश बंदी घालण्यात आली असून ही वाहने पर्यायी मार्गांनी वळविण्यात येणार आहेत. तसेच वाघोली चौक, पेरणे फाटा, भारतमाता चौक व मोशी चौक मार्गे भीमा-कोरेगावकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. चाकण–शिक्रापूर–शिरूर मार्ग फक्त अत्यावश्यक सेवा वाहतुकीसाठी खुला राहील; इतर वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
वाहतूक बदलांची माहिती देण्यासाठी माहिती फलक, अतिरिक्त पोलीस बंदोबस्त आणि मार्गदर्शन पथके तैनात करण्यात आली आहेत. नागरिक, भाविक व वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे आणि अनावश्यक वाहने घेऊन भीमा-कोरेगाव परिसरात येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भीमा-कोरेगाव विजयस्तंभ भेटीच्या शताब्दी वर्षाची औपचारिक सुरुवात १ जानेवारी २०२६ रोजी होत आहे. या निमित्ताने बाबासाहेबांसोबत विजयस्तंभावर अभिवादनासाठी आलेल्या अनुयायांच्या कुटुंबीयांचे संयुक्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
याचवेळी, शौर्यस्तंभातून प्रेरणा घेऊन महार रेजिमेंटची स्थापना करण्याची मागणी बाबासाहेबांनी १९२७ साली केली होती, त्या ऐतिहासिक स्मृतींना उजाळा देत यशसिद्धी आजी-माजी सैनिक फाऊंडेशनच्या वतीने सुमारे ३,००० निवृत्त सैनिक लष्करी इतमामाने राष्ट्रगीताद्वारे महार रेजिमेंटला मानवंदना देणार आहेत.




