सातारा(संदीप डाकवे) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या मार्फत आयोजित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे यांनी शिक्षक व अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी आयोजित केलेल्या एम एस पीपीटी आणि एम एस वर्ड व एक्सेल स्पर्धेत पाटण तालुक्याचा अभिमान वाढवणारे यश मिळाले आहे. पाटण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज काळगाव येथे कार्यरत असलेल्या श्रीम. माने सारिका आणि श्री. साबळे माधव यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे.
तालुका स्तरावरील 100 गुणांच्या परीक्षेत अव्वल क्रमांक मिळवत त्यांनी हे यश पटकावले. अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या श्रीम.माने मॅडम व श्री.साबळे सर यांनी विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या जडण – घडणीत मोलाचे योगदान दिले आहे. श्रीम. माने मॅडम यांनी तालुका व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन, इन्स्पायर ॲवॉर्ड तसेच संस्थेच्या विविध उपक्रमांत तसेच श्री. साबळे सर यांनी संस्था , विविध शासकीय आणि सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग नोंदवला आहे. श्रीम. माने मॅडम व श्री. साबळे सर यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे अधिकारी व पदाधिकारी, पाटण तालुका गटशिक्षणाधिकारी ,विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी त्यांचे अभिनंदन करून विभागीय स्तरासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांचा गौरव केला. पाटण तालुक्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक म्हणून श्रीम. माने सारिका माने व श्री. साबळे माधव यांचे हे यश प्रेरणादायी ठरत आहे.



