प्रतिनिधी :

भाईंदर पूर्वेकडील लोकवस्तीत बिबट्याने शिरकाव करत अनेक नागरिकांवर हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्याचे वनमंत्री व पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यानंतर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची रुग्णालयात जाऊन त्यांनी विचारपूस केली व त्यांच्या उपचारांची माहिती घेतली.
सदर घटना लक्षात घेता वनविभाग, पोलीस विभाग, स्थानिक आमदार तसेच सर्व कार्यकर्ते सतर्कता बाळगून मानवी वस्त्यांमध्ये अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी योग्य तो बंदोबस्त करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
वन क्षेत्रात झालेल्या अतिक्रमणामुळे वन्यजीव जंगलाबाहेर मानवी वस्त्यांकडे येऊ लागल्याचे वास्तव समोर येत आहे. बिबट्याला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या शेड्यूल १ मधून वगळून शेड्यूल २ मध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच संभाव्य ठिकाणी पिंजरे लावण्याची कार्यवाही सुरू आहे.
नागरिकांचे प्राण जात असल्याबाबत दुःख व्यक्त करत बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या उपचारांचा संपूर्ण खर्च वनविभागाकडून करण्यात येईल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले आहे.




