मुंबई

– स्त्रीमुक्ती चळवळीला ५० वर्ष पुर्ण होत असून यानिमित्ताने यशवंतराव चव्हाण सेंटर येथे तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्याहस्ते झाले. या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून अँड.इंदिरा जयसिंग, डाँ.सईदा हमीद, महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे आदी मान्यवर उपस्थित होते. सोबत संघटनेच्या डाँ.छाया दातार, डाँ.प्रज्ञा दया पवार, अँड.निशा शिऊरकर, डाँ.चयनिका शहा, लता भिसे-सोनावणे, हसीना खान, अमोल केरकर, सुनीता बागल, शुभदा देशमुख, संगीता जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
परिषदेची सुरूवात स्त्रीमुक्ती चळवळीच्या प्रथेनुसार स्त्रीमुक्ती विषयावर गाणी सादर करून झाली. या परिषदेला महाराष्ट्रातील ३१ जिल्हयातून ८००हून अधिक विविध जाती पंथातील महिला प्रतिनिधी, ट्रान्सजेंडर यांनी हजेरी लावली होती. यात सुमारे ९२ स्त्री मुक्ती संघटनांचा सक्रीय सहभाग लाभला तसेच गेल्या वर्षभरात महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेने राज्यभरात विभागनिहाय महिलांच्या समस्या समजून त्यावर कशाप्रकारे काम केले याची थोडक्यात तपशीलवार माहिती देण्यात आली. तसेच, परिषदेने गेल्या काही महिन्यात केलेल्या सेफ्टी आँडीटचा अहवालाची माहिती देण्यात आली.
*यावेळी बोलताना अँड.इंदिरा जयसिंग म्हणाल्या,* महात्मा गांधी आणि डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ख-या अर्थाने स्त्रीमुक्ती देशात आणली. एकाने रस्त्यावर येऊन आंदोलन करण्यास शिकवले तर आपल्या मुलभूत अधिकारासाठी झगडायला डाँ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिकविले.
दरवेळी आपल्या संविधानाचे जनक (बाबा) कोण असा प्रश्न नेहमी विचारला जातो. पण, आपल्या संविधानाच्या आई कोण असा प्रश्न कोणीच विचारत नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली.
एककाळ असा होता जेव्हा पाण्यासारख्या मुलभूत अधिकाराची समस्या सोडविण्यासाठी मृणालताई गोरे, अहिल्याबाई रांगणेकर यांसारख्या स्त्रियांना ‘लाटणे मोर्चा’ काढून रस्त्यावर उतरावे लागले. तर प्रमिला दंडवते यांनी हुंडाविरोधी चळवळ सुरू करून पार गावागावात पोहचविली. निरा देसाई यांनी शैक्षणिक परंपरेचा पुरस्कार केला तर निर्मला देशपांडे यांनी पाक, नेपाळ, बांग्लादेश, श्रीलंका आणि आपण, देश जरी वेगळे असले तरी सर्व स्त्रियांच्या समस्या सर्वत्र सारख्याच असल्याची जाणीव करून दिली.
१९७५ मध्ये संयुक्त राष्ट्राने ८मार्च हा जागतिक महिलादिन म्हणून जाहीर केला. जगभरातील स्त्रियांना अजूनही समान हक्क मिळाले नाहीत असे जाहीर केले आणि म्हणूनच स्त्रीमुक्ती चळवळीला ख-या अर्थाने सुरूवात झाली. बदलत्या काळानुसार स्त्रीमुक्ती चळवळीसमोर अनेक नवनवीन समस्या उभ्या राहत आहेत. जसे, (LGBTQ) पारलिंगी समाज यांनाही मुलभूत अधिकार मिळावे म्हणून स्त्रीमुक्ती परिषद लढा देत आहे. पंचायत राज आले. स्त्रीला अधिकार मिळाले असे म्हटले जाते, पण प्रत्यक्षात खरा अधिकार पंचायत स्त्रीच्या नव-यालाच मिळाला जातो किंवा त्यांचाच वरचष्मा असतो. स्त्रीमुक्ती लोकतंत्रावर चालते. लोकतंत्र चालले तर ख-या अर्थाने स्त्रीमुक्तीही चालेल.
*यावेळी सन्मा.पाहुण्या डाँ.सईदा हमीद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की,* इतक्या प्रंचड संख्येने महिला प्रतिनिधीचीं उपस्थिती पाहून मला खुप आनंद होत आहे. प्लँनिंग कमिशनमध्ये काम करताना महाराष्ट्रातील मालेगाव आणि गडचिरोली येथील परिस्थितीचा आढावा घेऊन वस्तुस्थिती राष्ट्रासमोर आणली. महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती परिषदेचे काम पाहून ख-या अर्थाने नूर की झलक काय ते समजते. आज या ठिकाणी येऊन मला आनंद होत आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी मी काम केले आहे पण स्त्रीमुक्तीसाठी काम करायला मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यत कार्यरत राहिल असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून खा.सुप्रिया सुळे यांनी पाच दशकाच्या स्त्रीमुक्ती चळवळीच्या आठवणींना थोडक्यात उजाळा दिला. स्त्री-पुरूष समानतेच्या वातावरणातच माझी वाढ झाली. आज राजकारणात स्त्रिया जरी मोठ्या प्रमाणात येत असल्या, सरपंच बनल्या तरी कारभार मात्र त्यांचे एसपी म्हणजेच सरपंच पतीच्या हातात असतो. हुंडयामुळे आजही स्त्रियांची आत्महत्या होत आहे. मेट्रो आल्या परंतू प्रवास सुरक्षित नाही आहे. शाळांमधून, घरांमधून स्त्रीला जेव्हा ख-या अर्थाने सन्मानाची वागणूक मिळेल तेव्हाच ख-या अर्थाने स्त्रीची मुक्ती होईल.
पुढे त्या म्हणाल्या की, नुकताच केंद्र सरकारने जीरामजी नरेगा ठराव लोकसभेत मंजूर केला असून यामुळे रोजगार हमी योजनेवर जो परिणाम होईल तो चिंताजनक आहे. तसेच, रोटी, कपडा, मकान ही समस्या एकीकडे तर आगामी काळातील होऊ घातलेले अणुकरार ठराव ही सर्वात भेडसावणारी मोठी समस्या असेल. याचे कितपत गंभीर परिणाम होतील याचा सर्वांनी आतापासूनच डोळसपणे विचार करणे गरजेचे आहे असे सांगून स्त्री मुक्ती परिषदेचे आभार मानले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या अध्यक्ष शारदा साठे यांच्याहस्ते उपस्थित मान्यवरांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.




