मुंबई : २०२५ रोजी पूर्वनियोजित सूचनेनुसार संत रोहिदास समाज फाऊंडेशन कमिटीची बैठक शासकीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रांतीगृहात, बांद्रा (पूर्व) येथे पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संपत धोंडिबा कदम होते.
बैठकीच्या सुरुवातीस विषयांवरील चर्चा झाल्यानंतर संघटनेच्या हितासाठी सी. के. जाधव (निवृत्त सहसचिव, समाज कल्याण विभाग), अच्युतराव भोईटे (मनपा निवृत्त अधिकारी) तसेच ईश्वर विलासराव ताथवडे — संत रोहिदास नवपरिवर्तन सेनेचे संस्थापक-अध्यक्ष, जनता प्रभाव वर्तमानपत्रचे संपादक, निर्भीड पत्रकार आणि नवनियुक्त रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) महाराष्ट्र प्रदेश सचिव — यांच्यासोबत संयुक्त बैठक घेण्याचा विषय मांडण्यात आला. यास उपस्थित सर्व सदस्यांनी एकमताने अनुमोदन दिले.
बैठक सुरू होण्यापूर्वी संपत धोंडिबा कदम यांनी उपस्थित सर्व मान्यवरांची ओळख करून दिली. यावेळी ईश्वर विलासराव ताथवडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आपल्या भाषणात ताथवडे यांनी संघटनेला कायदेशीर बाबी, प्रसारमाध्यमे तसेच अडीअडचणीच्या वेळी संघटना व समाजबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.
यानंतर अच्युतराव भोईटे यांनी आपले परखड विचार मांडताना समाजाने आता चर्मकार महामंडळाकडे न जाता थेट समाज कल्याण विभागाकडूनच आपले हक्क मागावेत, असे मत व्यक्त केले. चर्मकार महामंडळाकडे निधी अपुरा असून मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गरजू समाजबांधवांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी उदाहरणांसह स्पष्ट केले. समाज कल्याण विभागाकडे केंद्र व राज्य सरकारचा मोठा निधी उपलब्ध असून त्यातून शिक्षण, जमीन, उद्योग-व्यवसाय, बांधकाम आदींसाठी थेट लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले.
यावेळी सी. के. जाधव यांनीही समाज कल्याण विभागाकडे येणाऱ्या निधीचा योग्य वापर समाजासाठी होत नसल्याची खंत व्यक्त केली. समाजातील लोक चर्मकार महामंडळात अडकून पडल्यामुळे त्यांचा हक्काचा निधी इतर योजनांकडे वळवला जातो, असे त्यांनी नमूद केले. यावर संघटनेमार्फत जनजागृती करण्याची गरज असल्याचे मत सर्वांनी व्यक्त केले.
बैठकीत संजय कदम यांनी संघटनेची माहिती दिली, तर महेंद्र कारंडे यांनी संघटनेची ध्येय-धोरणे व मागील तीन वर्षांतील कार्याचा आढावा सादर केला.
या बैठकीस संपत कदम, संजय कदम, पांडुरंग चिकणे, सदाशिव कारंडे, महेंद्र कारंडे, राजाराम कदम, ज्ञानदेव वर्पे, अच्युतराव भोईटे, चंद्रकांत जाधव आदी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी समाजहितासाठी लवकरच पुन्हा बैठक घेऊन नागरिकांमध्ये हक्कांविषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. संपत कदम यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून बैठकीची सांगता केली.




