ताज्या बातम्या

मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना–भाजप जागावाटपावर तणाव, शिंदे गटाला प्रत्येक जागेसाठी संघर्ष

मुंबई(भीमराव धुळप) :

मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत तणाव स्पष्टपणे समोर येत आहे. याच अनुषंगाने काल मुंबईत दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने २०१७ च्या निवडणुकीत जिंकलेल्या ८४ जागांवर आपला ठाम दावा मांडला. मात्र भाजपने ही मागणी स्पष्टपणे फेटाळून लावली.

भारतीय जनता पक्ष ने २०१७ मध्ये शिवसेना ने जिंकलेल्या ८४ जागा यंदाही शिंदे गटाला सोडण्यास नकार दिल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत शिंदे गटाला मुंबईत केवळ ५२ जागा देण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू होती. मात्र काल झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत दोन्ही पक्षांनी ही चर्चा फेटाळून लावली.

तरीही, एकूण परिस्थिती पाहता जागावाटपात शिंदेंच्या शिवसेनेला प्रत्येक जागेसाठी संघर्ष करावा लागत असल्याचे चित्र आहे. दुसऱ्या बैठकीनंतर शिवसेना–भाजपमध्ये सुमारे १५० जागांवर एकमत झाल्याचे सांगण्यात आले असले, तरी शिवसेनेला अपेक्षित असलेल्या अनेक जागा भाजपकडून सोडल्या जात नसल्याचे दिसून येत आहे.

भाजप केवळ शिंदे गटाची पूर्ण ताकद असलेल्या जागाच शिवसेनेसाठी सोडण्यास तयार असल्याची चर्चा आहे. इतर ठिकाणी जर विरोधी पक्षाचा मजबूत उमेदवार असेल, तर महायुतीला पराभवाचा धोका असल्याने सत्ताधारी पक्ष अधिक सावध भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, भाजपने २०१७ मध्ये जिंकलेल्या ८२ प्रभागांपैकी काही मराठीबहुल जागांची शिंदे गटाशी अदलाबदल करून भरपाई केली जाऊ शकते, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींवर एकनाथ शिंदे पुढे कोणती भूमिका घेणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top