ताज्या बातम्या

प्राचीन ज्ञान-परंपरेची आधुनिक तंत्रज्ञानाशी सांगड घालत भारताची ‘विश्वगुरू’ होण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : प्राचीन भारत हा जगातील सर्वाधिक प्रगत आणि आर्थिक महासत्ता असणारा देश होता. भारतातील ज्ञान, परंपरा आणि संस्कृतीमुळे देश जगात आघाडीवर होता. या प्राचीन ज्ञानाची आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी प्रभावी सांगड घातल्यास भारत पुन्हा एकदा विश्वगुरू होऊ शकतो, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

वांद्रे-कुर्ला संकुलातील ग्रँड हयात येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर के पी ग्लोबलचे अध्यक्ष राजेश शर्मा, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक अध्यक्ष स्वामी विद्यानंद, जे एस डब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदाल आयटी मंत्राचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक शैलेश त्रिवेदी उपस्थित होते.

इनव्हेशन, सेल्फ रिलायन्स अँड प्रोस्पेरिटी’ (शोध, स्वावलंबन आणि समृद्धी) या देशाच्या विकासदिशा ठरविणाऱ्या संकल्पनेवर या मंचावर मंथन होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंदू ही केवळ धर्मव्यवस्था नसून जीवनपद्धती व विचारप्रणाली आहे. हजारो वर्षांपासून ही परंपरा जिवंत आहे. अनेक प्राचीन संस्कृती लुप्त झाल्या; मात्र सिंधूहिंदू संस्कृती आजही टिकून आहे. पुराव्यांवर सिद्ध झालेले हे सांस्कृतिक सातत्य दहा हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे दर्शवते. भारत हा नवनिर्मितीचा मूळ स्रोत आहे. खगोलशास्त्र व भूगोलासारखी शास्त्रे प्राचीन काळात भारतात अत्यंत प्रगत होती. वेद आणि वेदपूर्व साहित्यामध्ये त्याची साक्ष आढळते. जगात आता पाचवी औद्योगिक क्रांती सुरू असून ही क्रांती डिजिटायजेशनमुळे होत आहे. तसेच एआय आणि डाटा या क्षेत्राला या क्रांतीमध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. यासाठी लागणारे उत्पादन महत्वाचे आहे. उत्पादन क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचे कणा आहे. इनोव्हेशनचे मूळ उत्पादनातच आहे आणि या क्रांतीचे नेतृत्व करण्याची क्षमता भारताकडे आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आणि डेटा क्षेत्रात भारत आघाडीवर असून २०३० पर्यंत जगातील सर्वाधिक डेव्हलपर्स भारतीय असतील, असे मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्य नाडेला यांनीही नमूद केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. एआयमुळे उद्योगांमध्ये आमूलाग्र बदल होत असून या इनोव्हेशनमध्ये नेतृत्व करण्याची क्षमता भारतात आहे.

आत्मनिर्भर भारत या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या संकल्पनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, १४० कोटी लोकसंख्येचा देश आत्मनिर्भर बनणे अत्यावश्यक आहे. स्वदेशी म्हणजे देशातच उत्पादन, भारतीय कंपन्यांमार्फत तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येत आहे. चीनने जपानचे तंत्रज्ञान वापरले, त्याचे रिव्हर्स इंजिनिअरिंग केले. पण भारतात तंत्रज्ञान समजून घेऊन आत्मनिर्भर होण्याची क्षमता आहे. तंत्रज्ञानाला आज असलेले महत्व ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अनेक क्षेत्रात तंत्रज्ञान हस्तांतरणाची अट घातली आहे.

श्री.फडणवीस म्हणाले, जगाचा चीनवरील विश्वास त्यांच्या विस्तारवादी धोरणांमुळे कमी झाला असताना भारताच्या नेतृत्वावर आणि संस्कृतीवर जागतिक विश्वास वाढत आहे. आफ्रिकेमध्ये विकासाच्या नव्या संधी असून, त्या संधींमध्ये जो देश सक्रिय सहभाग घेईल तोच जागतिक नेतृत्व करेल. भारत आणि आफ्रिकी देशांमधील संबंध दृढ असून अनेक आफ्रिकी देश प्रधानमंत्री नरेंद्र मोदींना आपला नेता मानतात.

मुंबईत लवकरच ५४ आफ्रिकी देशांना होस्ट करणारी एक भव्य इमारत उभारली जाणार आहे. उद्योजकांनी आफ्रिकेकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आफ्रिकेत नैसर्गिक साधनसंपत्ती प्रचंड असून नव्या तंत्रज्ञानासाठी आवश्यक कच्चा माल उपलब्ध आहे. आफ्रिकेत उत्पादन सुरू झाल्यास जागतिक अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल होईल आणि त्याचे नेतृत्व भारत करेल, असेही श्री. फडणवीस म्हणाले.

पापुआ न्यू गिनीच्या शिष्टमंडळाने गॅस उत्खननासाठी भारताला निमंत्रण दिल्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ही सर्व संधी भारताच्या प्राचीन परंपरेतून आलेल्या जागतिक विचारांचे फलित आहे. विचारांच्या बळावर जग जिंकण्याची ही परंपरा आहे. हे सर्व जोडण्याचे काम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसारखे मंच करू शकतात. जागतिक व्यापारात २० टक्के वाटा मिळवण्याचे स्वप्नही या व्यापक दृष्टिकोनातून साकार होऊ शकते. दरम्यान, श्री सिमेंटच्या बांगर ग्रुपने राज्यातील चंद्रपूर येथे २,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठीचे इंटेंट लेटर मुख्यमंत्री फडणवीस यांना मंचावर सादर केले. ही गुंतवणूक म्हणजे राज्याच्या विकासावर दाखवलेला विश्वास आहे.

स्वामी विद्यानंद म्हणाले की, या फोरमचा उद्देश देशाचा विकास हा आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला आर्थिक सक्षम बनवणे म्हणजे खरा विकास आहे. यासाठी सर्वांनीच आर्थिक विकासात सहभागी होणे गरजेचे आहे.

श्री. शर्मा म्हणाले की, जागतिक अर्थव्यवस्थेत भारत नक्कीच निर्णायक भूमिकेत असणार आहे. भारतात नवसंकल्पन मोठ्यावर असून निर्मिती क्षेत्रातही भारत आघाडी घेत आहे.

श्री जिंदाल म्हणाले की, महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक प्रगत राज्य आहे डावोस येथील ३ लाख कोटींचे कंपनीचे सामंजस्य करार प्रत्यक्षात येत आहेत. त्याचे श्रेय मुख्यमंत्री फडणवीस यांना आहे. यावेळी देशभरातील विविध शहरातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top