
मुंबई : मुंबई महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ निर्भय, मुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी, यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आवश्यक ती सर्व दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
मतदान केंद्रांची अंतिम यादी तयार करण्यापूर्वी प्रत्येक मतदान केंद्राची प्रत्यक्ष पाहणी करावी. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व कर्मचारी यांची नियोजित कालमर्यादेत नियुक्ती करून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने विविध दक्षता व निरीक्षण पथके कार्यरत ठेवावीत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग तसेच इतर संबंधित यंत्रणांमार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देशही गगराणी यांनी दिले.
मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी महानगरपालिका मुख्यालयात महानगरपालिका अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस व उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत ते बोलत होते.
राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्र निश्चितीसाठी ठरवून दिलेल्या निकषांनुसार बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात सुमारे १० हजार १११ मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व मतदान केंद्रांवर वीज पुरवठा, पिण्याच्या पाण्याची सुविधा, प्रसाधनगृहे, दिव्यांगांसाठी रॅम्प आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या सुविधांची पाहणी व पडताळणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करून त्यानंतरच अंतिम मतदान केंद्रांची यादी तयार करावी, असे निर्देश देण्यात आले.
तसेच मतदारांना आपली नावे शोधण्यासाठी मतदान केंद्रांच्या जवळ ‘मतदार सहाय्य केंद्र’ स्थापन करावीत. मतदान केंद्रांवर मतदारांना आवश्यक माहिती देणारे स्पष्ट फलक लावण्याचे निर्देशही आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत.




