मुंबई : महाराष्ट्राची पारंपारिक कला असलेली लेझीम ही दिवसेंदिवस लोप पावत असताना, ती जतन व संवर्धन करण्याचा निर्धार दहा वर्षांपूर्वी आठ–दहा मैत्रिणींनी केला. या निर्धारातूनच एक स्वतंत्र लेझीम पथक उभे राहिले. मिरवणुका, रॅली तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांत सातत्याने लेझीम नृत्य सादर करत या कलाकारांनी आपल्या कलेची ओळख निर्माण केली.
परंतु गल्लीतून सुरू झालेला हा प्रवास थेट देशाच्या राजधानीतील लाल किल्ल्यावर पोहोचेल, अशी कल्पनाही कधी केली नव्हती. ही ऐतिहासिक संधी पांडुरंग गुरव यांनी उपलब्ध करून दिली. त्यांच्या या मोलाच्या मार्गदर्शनाबद्दल पथकातील सर्व कलाकारांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमात महाराष्ट्राची पारंपारिक लेझीम सादर करताना महाराष्ट्राची शान मिरवण्याचा मान मिळाल्याने कलाकारांना विशेष अभिमान वाटत आहे. गल्लीतील लेझीम दिल्लीत पोहोचवण्याचा हा प्रवास अविस्मरणीय ठरला, असे कलाकारांनी सांगितले.
या पथकात महाराष्ट्रातील मुंबई घाटकोपर येथील सुनीता जगदाळे, दिपाली पवार, अंजू सोनवणे, ज्योती पाटील, ममता तईपरमबिल, वसुधा पवार, पूनम देठे आणि जयश्री विश्वे अशा आठ महिला कलाकारांचा समावेश होता. दिल्लीमध्ये झालेला आदरातिथ्याचा अनुभवही अत्यंत सुखद होता. दिल्ली सरकारकडून पाहुणचाराची विशेष काळजी घेण्यात आल्याचे कलाकारांनी नमूद केले.
या कार्यक्रमात १७५ देशांतील युनेस्कोचे सदस्य उपस्थित होते. भारतीय संस्कृतीबद्दल जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणि लेझीम सादरीकरणाला मिळालेला प्रतिसाद कलाकारांसाठी आनंददायी ठरला. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे ही त्यांच्या दृष्टीने लाखमोलाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या संपूर्ण प्रवासात त्यांना योग्य समजून प्रोत्साहन देणारे पांडुरंग गुरव तसेच दिल्लीतील महेंद्र कुमार सिंग यांचे मार्गदर्शनही मोलाचे ठरले. राजधानीतील लाल किल्ल्यावर लेझीम नृत्याच्या माध्यमातून भगवा फडकवताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण झाल्याशिवाय राहिली नाही, अशी भावना कलाकारांनी व्यक्त केली.
याआधी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय व मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महासंस्कृती महोत्सवात मुंबई येथे कला सादर करण्याची संधीही या पथकाला पांडुरंग गुरव यांनी उपलब्ध करून दिली होती. या सातत्यपूर्ण संधींमुळे लेझीमसारखी पारंपारिक कला नव्या पिढीपर्यंत पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे.




