मुंबई : महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेला ५० वर्ष पूर्ण झाल्याने मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सेंटरमध्ये येत्या २०,२१ आणि २२ डिसेंबरला तीन दिवसीय राज्यव्यापी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत गेल्या ५० वर्षांतील स्त्री चळवळीचा आढावा आणि पुढील ५० वर्षांच्या कामाची दिशाही ठरविण्यात येणार आहे. महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेसह ६५ हून अधिक संघटना मिळून अनेक वर्षांपासून महिलांचे स्वतंत्र आणि हक्कांसाठी कार्यरत आहेत.
महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषद ही राज्यातील एक महत्त्वाची सामाजिक चळवळ असून ती स्त्रियांचे हक्क, स्वावलंबन, समानता आणि न्याय यासाठी कार्यरत आहे. समाजातील स्त्रियांवरील वाढते हिंसाचार रोखण्यासाठी तसेच चर्चा घडवण्यासाठी महाराष्ट्र स्त्री मुक्ती परिषदेच्या वतीने राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली आहे.
ही परिषद केवळ ५० वर्ष पूर्ण झाली म्हणून उत्सव नाही तर सध्याच्या राजकारणाचे आणि अर्थकारणाचे भान जागरूक करणे आणि त्यासाठी लढण्यास तरुण पिढीला तयार करणे हा उद्देश आहे. आमचा आक्षेप आजच्या वातावरणाला आहे तो आक्रमकता आणि हिंसा याला प्रोत्साहन देत आहे. स्त्रियांची प्रगती ही तेव्हाच होऊ शकते जेव्हा समाजातील लोकांच्या विचारांमध्ये बदल होईल. महिलांचे प्रश्न समाजासमोर मांडत त्या प्रश्नांची उत्तर सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत. निराधार, गरजू महिलांपर्यत पोहचण्यासाठी पोस्टर्स, कलापथकं आणि भाषणे हा त्रिसूत्री कार्यक्रमातून परिषदेने आजतागायत अनेक उपक्रम राबविले जाणार आहे.




