मुंबई(रमेश औताडे) : मानवी हक्क दिनानिमित्त स्पीड ऑफ पिस इंडिया आणि मुंबई बहाई समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष समुदाय संमेलनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात स्पीड ऑफ पिस चे माजी विद्यार्थी, शिक्षक, पालक, विद्यार्थी तसेच बहाई समाजातील सदस्य असे जवळपास १०० जण सहभागी झाले होते. शांतता, न्याय आणि मानवतेच्या ऐक्याबद्दलची समान बांधिलकी व्यक्त करत उपस्थितांनी एकात्मतेच्या भावनेत सहभाग घेतला.
दोन्ही समुदायांच्या समान मूल्यांवर आधारित या संमेलनात शांतता, समता, बंधुता आणि न्याय या मानवी हक्कांच्या जिवंत अभिव्यक्तींवर चिंतन करण्यात आले. सागर गांगुर्डे, प्रोग्राम्स मॅनेजर उर्मी चंदा आणि मुंबई बहाई समाजाच्या नर्गिस गौर यांच्या संयुक्त आयोजनातून हा कार्यक्रम साकारला गेला. मानवी हक्क कार्यकर्ते ॲड. विनोद शेट्टी यांनी सत्तेचा गैरवापर आणि मानवी हक्कांचे होत असलेले उल्लंघन यावर प्रकाश टाकला.
बहाई दृष्टिकोन मांडताना ॲड. जेना़ सुनावाला यांनी शांतता ही केवळ स्वप्न नसून अटळ आहे, असा विश्वास व्यक्त केला. समाजपरिवर्तनात युवक आणि कनिष्ठ युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पदवीदान समारंभ व मोठ्या संख्येतील उपस्थितीने संवाद, शिक्षण आणि ऐक्याच्या माध्यमातून अधिक न्याय्य व सुसंवादी समाज घडवण्याचा सामूहिक संकल्प यावेळी करण्यात आला.




