नागपूर ( विवेक पाटकर ) :- हिवाळी अधिवेशनात कामकाजात सहभागी होण्यासाठी ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात दाखल झाले त्यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचलं. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता हे संविधानिक पद आहे ते हे सरकार नियुक्त करत नाही तर उपमुख्यमंत्री हे पद संविधानिक नाही ते काढून टाकावे.अशी मागणी करीत एकनाथ शिंदे यांच्यावर टिका केली.
या अधिवेशनात विरोधक सत्ताधाऱ्यांना वेगवेगळ्या मुद्द्यांवरून कोंडीत पकडत आहेत. लाडकी बहीण, बिबट्यांचा उच्छाद, शेतकरी कर्जमाफी याबाबत विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहेत. कामकाजात सहभागी होण्यापुर्वी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले. उपमुख्यमंत्री पदाला काही महत्त्व नाही, असे सांगत त्यांनी शिंदे यांच्यावर टिका केली. सध्या विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद रिक्त आहे. विरोधकांनी या पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव सुचवलेलं आहे. परंतु अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. याच मुद्द्यावर ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना डिवचले. ‘गेल्या वर्षी मी म्हटलं होतं की विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा सांगितला होता. भास्कर जाधव यांचं नावही सूचवलं आहे. पण उत्तर आलं नाही, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच नियम असला काय नसला तरी दोन, दोन उपमुख्यमंत्री पदं तयार केली जातात. मग विरोधी पक्षनेतेपद द्यायला घाबरता का? असा सवालही ठाकरेंनी केला.
दोनशे पेक्षा जास्त जागा निवडून आल्याने तुमचे सरकार मजबूत आहे. तुमच्या सरकारला केंद्र सरकारचा आशिर्वाद आहे. तरीही विरोधी पक्षनेतेपद का दिले जात नाही. तुम्ही एवढे कशाला घाबरता, असा सवाल त्यांनी केला. विरोधी पक्षनेतेपद दिले जात नसेल तर मग असंवैधानिक असलेले उपमुख्यमंत्री पदही काढून टाका. त्या त्या खात्याच्या नावाने मंत्री ओळखला गेला पाहिजे, असे ठाकरे म्हणाले. भाजपाचे नेतेच सांगतात की नंबर एकलाच महत्त्व असतं. नंबर दोनचं महत्त्व नाही, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला. ठाकरे यांची ही टोलेबाजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठीच आहे अशी चर्चा विधानभवनात रंगली आहे.
भाजपचे नेते अनेकदा उद्धव ठाकरे यांनी काँग्रेससोबत युती करून हिंदुत्व सोडल्याची टीका करतात. उद्धव ठाकरेंनी भगवा झेंडा सोडून दुसरा झेंडा हाती घेतला आहे, असाही आरोप केला जातो. यावर उत्तर देताना भाजपचा एक मंत्री गोमांस खातो असं म्हणत अमित शाह त्यांच्या शेजारी बसून जेवण करतात असे ठाकरे यांनी सांगितलं.अमित शाह फार मोठे हिंदुत्ववादी आहे. त्यांचा एक फोटो कुणीतरी ट्वीट केला आहे. मला अमित शाह यांनी हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही. भाजपनेही नाही आणि संघाने तर अजिबात नाही. तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत. मी गोमांस खातो. कोण मला आडवतो बघतो असे ते मंत्री म्हणतात. तो फोटो आहे, ९ डिसेंबरचा आहे. त्यांचं नाव किरण रिजिजू. त्यांच्या सोबत शाह जेवत आहे. त्यांच्या आणि यांच्या थाळीत काय असेल माहीत नाही. अमित शाह यांना माझ्या हिंदुत्वावर शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजीजू यांना मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्या टिकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मुख्यमंत्री पदासाठी ठाकरेंनी स्वतःचे “पायपुसणं” करून घेतले अशी टिका केली. ठाकरेंच्या हिंदुत्वावरील नैतिक अधिकारावर शंका उपस्थित करत. मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी.आर. स्वामीनाथन यांच्या विरुद्धच्या महाभियोग प्रस्तावावर उद्धव ठाकरेंनी सही केल्याचा दाखला देत, शिंदे यांनी ठाकरेंना हिंदुत्वावर बोलण्याचा अधिकार नसल्याचे म्हटले. ठाकरे जिंकल्यावर यंत्रणा चांगल्या असतात, तर हरल्यावर त्यांना त्या वाईट ठरतात. ईव्हीएम, मतदार यादी, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालय या सर्वांवर ठाकरे आक्षेप घेतात असे शिंदे महणाले. शेतकरी मदतीच्या मुद्द्यावर बोलताना, १४ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची आकडेवारी त्यांनी सादर केली आणि ठाकरेंनी याबाबत केलेला “खोटारडेपणा” आता लपून राहिलेला नाही असे शिंदे यांनी म्हटले.




