कराड(प्रताप भणगे) : श्री निनाई देवी विद्यालय तुळसण येथे इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस मार्गदर्शन करण्यासाठी कराड शहरातील ज्येष्ठ मनोवैज्ञानिक डॉ. सुनील कुमार पाटील यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. पाटील म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांना लक्षात न राहणे, गणित व इंग्रजी विषयांची भीती वाटणे यांसारख्या अडचणी प्रकर्षाने जाणवत आहेत. या समस्या दूर करण्यासाठी मेडिटेशन, एकाग्रता, सातत्याने सकारात्मक विचार आणि निरोगी सवयी आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईल फोन आणि सोशल मीडियाचा अल्प वापर, नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि फास्ट फूडपासून दूर राहणे हे विद्यार्थी जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. पाटील यांनी अधोरेखित केले. डॉ. एपीजे अब्दुल कलाम, नारायण मूर्ती यांसारख्या महान व्यक्तिमत्त्वांचा आदर्श ठेवून सातत्याने स्वतःला प्रेरित करण्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैभव जाधव यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार विद्यालयाचे मुख्याध्यापक कल्याण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आनंदराव जानुगडे, अस्मिता पाटील, ग्रंथपाल पाटील सर, जयवंत काटेकर, शिवाजी नलावडे, संजय साळुंखे, विठ्ठल काटेकर तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.




