
नागपूर : “संविधान समजून घेणारा आणि ते सर्वसामान्यांना सहज समजेल अशा भाषेत मांडणारा देशात दुसरा मुख्यमंत्री नाही,” अशा गौरवोद्गारांतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केले.
विधानसभेत फडणवीस यांनी केलेल्या भाषणावर आधारित ‘भारतीय संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी बोलताना शिंदे यांनी फडणवीस यांच्या अभ्यासू वृत्तीपासून कार्यशैलीपर्यंत अनेक अंगांनी स्तुती केली. याप्रसंगी राज्यपाल आचार्य देवव्रत, विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपसभापती नीलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मार्चमधील विधानमंडळ अधिवेशनात संविधानावर झालेल्या सर्वपक्षीय चर्चेत फडणवीस यांचे भाषण हे “चर्चेचा कळसाध्याय ठरले,” असे सांगत शिंदे म्हणाले की, फडणवीस यांनी संविधानाचा इतिहास, त्याची वाटचाल, तत्त्वज्ञान आणि उदाहरणांद्वारे विविध पैलू अतिशय सोप्या भाषेत उलगडले असून त्याच भाषणाचे हे पुस्तक आता समाजासाठी दिशादर्शक ठरणार आहे.
फडणवीस यांच्या कायद्यावरील दांडग्या अभ्यासाचा, अर्थशास्त्रातील सखोल पकडीचा आणि प्रशासन हाताळण्यातील कौशल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री असा त्यांचा प्रवास त्यांच्या क्षमतेचे प्रतीक आहे. याच संदर्भात त्यांनी भावनिक भाषेत म्हटले —
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सावजी सारखे तिखट आणि नागपुरी संत्र्यासारखे गोड आहेत.”
गंभीर परिस्थितीतही शांत, स्थिर आणि थंड डोक्याने निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अद्वितीय असल्याचेही शिंदे यांनी नमूद केले.
कलम 370 विषयी फडणवीस यांनी भाषणात मांडलेल्या दृष्टिकोनाचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, “कलम 370 ला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विरोधी होते, हे फडणवीस यांनी दाखल्यांसह स्पष्ट केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ते ऐतिहासिक कार्य पूर्ण केले, याचा त्यांनी अभिमानाने उल्लेख केला.” संविधान धोक्यात असल्याच्या फेक नॅरेटिव्हचाही त्यांनी पर्दाफाश केल्याचे शिंदे म्हणाले.
या भाषणात शिंदे यांनी आपली आणि फडणवीस यांची वैयक्तिक जवळीकही व्यक्त केली. “कर्करोगाने वडिलांचे निधन झाल्यानंतर नागपुरात कॅन्सर हॉस्पिटल उभारून रुग्णांना आधार देणारा हा हळवा माणूस आम्ही पाहिला आहे,” असे सांगत त्यांनी 2022 मधील निर्णायक काळात फडणवीस यांनी दिलेला मित्रत्वपूर्ण आधारही स्मरला. “अमिताभ बच्चन ज्याप्रमाणे बॉलिवूडचे ‘बिग बी’, त्याप्रमाणे देवेंद्रजी सभागृहाचे ‘BIG D’ — Dedication, Determination, Discipline आणि Devotion,” अशा शब्दांत त्यांनी त्यांचा गौरव केला.
पुस्तकाचा प्रसार सर्व भाषांत व्हावा, राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालय व ग्रंथालयात ते उपलब्ध व्हावे, राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी ते संदर्भग्रंथ म्हणून वापरावे, अशी अपेक्षा शिंदे यांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींनीही हे पुस्तक वाचून अध्ययन करावे, अशी त्यांनी सूचना केली. “देवेंद्रजी अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक भाषण करत राहोत. अशा अनेक पुस्तकांचा लाभ महाराष्ट्राला मिळत राहो,” अशी शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी शिंदे यांनी संविधान मूल्यांची जपणूक, लोकशाही बळकट करण्याचा संकल्प आणि शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याची कटिबद्धता व्यक्त करत राज्यपाल, सभापती व आयोजकांचे आभार मानले.




