मुंबई :- राज्यात मुंबई उच्च न्यायालयाअंतर्गत असलेल्या‘ महाराष्ट्र राज्य विधि सेवा प्राधिकरण‘ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्व कारागृहांमध्ये बुधवारी 10 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवसाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग ‘ही राज्यातील मानवी हक्कांबाबत कायदेशीर कारवाई करणारी संस्था आहे.
10 डिसेंबर 1948 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने ‘मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा‘ (यूडीएचआर) स्वीकारला होता. म्हणूनच 10 डिसेंबर हा दिवस मानवी हक्कांबद्दल जागरुकता वाढवण्यासाठी साजरा होतो. कैद्यांना त्यांच्या कारावासातील कालावधीत त्यांचे जीवन, समता, सन्मान आणि स्वातंत्र्याबद्दलचे कायदेशीर अधिकार कळावेत, याकरिता हा जागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष मा. न्यायमूर्ती ए. एम. बदर यांच्या संकल्पनेतून, सदस्य मा. न्यायमूर्ती, स्वप्ना जोशी, संजय कुमार (भापोसे) यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील सर्व कारागृहांत ‘कैद्यांचे मानवी हक्क आणि संरक्षण‘ या विषयी माहितीपुस्तिकेचे वाटप आणि मार्गदर्शन करून कायदेविषयक जागृती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे सचिव प्रदीपकुमार डांगे (भाप्रसे) आणि महाराष्ट्र कारागृह व सुधार सेवा या संस्थेचे अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक सुहास वारके (भापोसे) तसेच विजय केदार, निबंधक, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यातील सर्व प्रमुख जिल्हा न्यायाधीश, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, कारागृह प्रशासनाचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.



