सातारा(अजित जगताप) : छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये मराठा बांधवांना त्यांच्या मूळ कुणबी मराठा दाखल्यावरून इतर मागासवर्गीय गटात समावेश व्हावा. यासाठी कुणबी मराठा जातीच्या दाखल्याच्या वितरणासाठी मोठ्या प्रमाणात भ्रष्ट अधिकाऱ्यांनी उकळ पांढरे केले आहे. या प्रकारची सखोल चौकशी करावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून अनेक अधिकाऱ्यांकडून आंदोलनासाठी निधी गोळा केल्याची ही चर्चा दबक्या आवाजात सुरू झालेली आहे.
विदर्भातील नेते आदरणीय पंजाबराव देशमुख यांनी मराठा समाजाला विशेषता कुणबी मराठा म्हणजे शेती करणाऱ्या बांधवांसाठी कुणबी मराठा आरक्षण असावे. यासाठी महामानव घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. परंतु, त्या वेळेला समाजातील काही सधन असल्यामुळे कुणबी मराठा बांधवांनी फारसं गांभीर्याने आरक्षणाकडे पाहिले नाही. आता परिस्थिती बदललेली आहे. कुणबी मराठा समाज आत्महत्या करून आपले दुःख मांडत आहे. तर दुसऱ्या बाजूला धन दांडगे मराठा जातीचे दाखले काढून प्रतिनिधित्व ओरबडून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
शेती करणारा कुणबी अर्थात कुणबी मराठा या जातीच्या दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणात कागदपत्राची पूर्तता करावी लागते. कुणबी मराठा दाखल्यातून सातारा जिल्ह्यात काही सरकारी अधिकाऱ्यांचे कल्याण झाले आहे .महाराष्ट्रात मराठा समाज पूर्वीपासून कुणबी मराठा म्हणून ओळखला जातो. परंतु मुलांच्या शाळेच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशा नोंदी आढळून आली आहे.
आज रोजी मराठा समाजाला कुणबी मराठा दाखला मिळत नाहीत. मराठा समाजाने मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कुणबी मराठा दाखला मिळण्यासाठी आंदोलन केले. याची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला कुणबी मराठा दाखला देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले होते .परंतु दाखले देताना अधिकाऱ्यांच्याकडून प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे .
मागील पाच वर्षात दिलेल्या दाखल्यापैकी काही घाई गडबडीत भ्रष्ट मार्गाने दिलेले दाखले बोगस निघाले आहेत. यातून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे. याची सी.आय.डी. मार्फत चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी पंजाबराव पाटील यांनी केली आहे.
मराठा समाजातील धनदांडग्या लोकांनी लाखो रुपये संबंधित अधिकाऱ्यांना लाच देऊन स्वतःच्याच कुटुंबातील सदस्यांना कुणबी मराठा दाखले मिळवलेले आहेत. या दाखल्यावर त्यांनी शिक्षणाच्या व नोकरीच्या राजकीय सवलती मिळवलेल्या आहेत. याची चौकशी सरकारने करावी. खऱ्या अर्थाने संपूर्ण मराठा समाज हा कुणबी मराठाच आहे. परंतु, सरकार ते मान्य करत नाही .
जुन्या कागदपत्राच्या आधारे कुणबी दाखले दिले जात आहेत. असे दाखले देताना संबंधित अधिकारी कागदपत्रात त्रुटी दाखवून कुणबी मराठा जातीचा दाखला देण्यासाठी लाभार्थ्याकडून लाखो रुपये वसूल करत आहेत. मराठा समाजातील धनदांडगे अशाप्रकारे लाच देऊन दाखले मिळवत आहेत. या विरोधात सोयीनुसार राज्यकर्ते ही गप्प बसून आहेत. या प्रश्नाबाबत सत्ताधारी व विरोधक यांची अघोषित युती व आघाडी झालेली आहे. त्यामध्ये गोरगरीब मराठा भरकटला जात आहे.
मराठा समाजातील गोरगरीब लोकांना गरज असून सुद्धा कुणबी मराठा दाखला मिळत नाही. ही वस्तुस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांना बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने विनंती करतो की, सध्या राज्यामध्ये कुणबी मराठा दाखला देताना कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार होत आहे. याची उच्चस्तरीय सखोल व सीआयडी मार्फत चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकारी आणि लाभार्थी यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. व गरजू मराठा समाजाला कुणबी मराठा दाखला देण्याची पारदर्शक व्यवस्था उपलब्ध करण्यात यावी ही विनंती अन्यथा प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२६ रोजी मुंबई मंत्रालयासमोर बळीराजा शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल. याची नोंद घ्यावी असे बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी इशारा दिला आहे.
चौकट — खऱ्याखऱ्या गरीब व कष्टकरी कुणबी मराठा समाजाला इतर मागासवर्गीय गटातून आरक्षणाचा लाभ मिळालाच पाहिजे. परंतु, सध्या कुणबी मराठा जातीचे दाखले अक्षरशः विकत घेतली आहेत. त्यांच्यामुळे कुणबी मराठा समाजावर अन्याय झाल्यास त्याला सरकार जबाबदार राहील. अशी आता चर्चा सातारा जिल्ह्यात सुरू झाली आहे.
_______________________________
फोटो– बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील




