खोपोली – परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज यांच्या समाधी स्थळी रविवार, दिनांक ७ डिसेंबर २०२५ रोजी “गगनगिरी भंडारा” सोहळा उत्साहात संपन्न होणार आहे. ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा भंडारा वर्षानुवर्षे भक्तांच्या आध्यात्मिक केंद्रस्थानी ठरला असून यंदाही मोठ्या भक्तसंख्येची उपस्थिती अपेक्षित आहे.
स्वामी गगनगिरी महाराजांचे कृपापात्र शिष्य ब्रह्मलीन महामंडलेश्वर स्वामी आबानंदगिरी महाराज यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या भव्य सोहळ्यात स्वामी गगनगिरी तसेच स्वामी आबानंदगिरी भक्त परिवाराला गुरूकृपा, दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ मिळणार आहे.
कार्यक्रमाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे : सकाळी ११.०० – श्रीगणेश, सोमजाई देवी, शिवलिंग व इतर देवता पूजन, दुपारी १२.०० – होम–हवन, दुपारी १.०० – परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज समाधी पाद्यपूजन, दुपारी १.३० – आरती व महाप्रसाद होणार आहे.
हा सोहळा स्वामी गगनगिरी महाराज समाधी, पाताळगंगा, तीर्थक्षेत्र खोपोली येथे होणार असून, उत्तराधिकारी महंत राजेंद्र गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.
कार्यक्रमाचे आयोजन समस्त स्वामी आबानंदगिरी महाराज साधक व भक्त परिवार यांनी केले असून सर्व भक्तांना उपस्थित राहून गुरूकृपेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.




