ठाणे (प्रतिनिधी) : ‘कामगार-कवी’ अशी लोकमान्यता असणाऱ्या पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या ‘जन्मशताब्दी’निमित्त ठाण्यात नुकताच
नारायण सुर्वे यांच्या कवितांचा जागर संपन्न झाला. ‘कामगार-कवी पद्मश्री नारायण सुर्वे जन्मशताब्दी महोत्सव समिती, ठाणे जिल्हा’ यांच्या वतीने, ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या सभागृहात दिग्गज कवी आणि डाव्या चळवळीतील मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. या कवी-संमेलनात, प्रज्ञा दया पवार, अरुण म्हात्रे, छाया कोरेगांवकर, सुरेखा पैठणे, अनिता भारती, शिवा इंगोले, शिवराम सुकी आणि बबन सुरवदे या चळवळीतील कवींनी आपल्या कविता सादर केल्या; तर, ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी, “नारायण सुर्वे : एक विचार” यावर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नारायण सुर्वे यांच्या जीवन पटावरील एक लघुपट देखील सादर करण्यात आला. दरम्यान, कार्यक्रमाची सुरुवात संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हौतात्म्य पत्करलेल्या, हुतात्मा स्मारकाच्या प्रति कृतीला अभिवादन करुन व दिप प्रज्वलनाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कामगार-नेते राजन राजे होते तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून, ‘महाराष्ट्र राज्य लाल बावटा शेतमजूर युनियन’चे कार्याध्यक्ष राम बाहेती हे मंचावर उपस्थित होते. यावेळी आपले विचार मांडताना दलित साहित्यिक अर्जुन डांगळे यांनी, नारायण सुर्वे यांच्या कवितेला प्रस्थापित समीक्षकांनी न्याय्य दिला नसल्याचे बोलून दाखवले. यावेळी पुढे बोलताना डांगळे म्हणाले की, कवितेच्या तळाशी जाऊन भूमिकेला पुरेपूर न्याय्य देणे हीच सुर्वे यांची मूळ धारणा होती. त्यांच्या कवितांमध्ये मार्क्सवाद रुजला होता, ते दलित साहित्यात रमलेले कष्टकरी वर्गाचे प्रतिनिधी होते. नारायण सुर्वे यांनी, राजकीय व सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे, तेवढ्याच प्रखरतेने आपल्या कवितांमधून मांडून, नवीन प्रतिभा विश्व निर्माण केल्याचे अर्जुन डांगळे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राम बाहेती आपल्या भाषणात, आपले विचार मांडताना म्हणाले की, सद्यस्थितीत मार्क्स वादावर जगभरात हल्ले सुरु आहेत. नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दी प्रमाणेच, कम्युनिस्ट पक्ष व ‘आरएसएस’ चे देखील हे शताब्दी वर्ष आहे; मात्र, फक्त भारतातच नव्हे; तर, जगभरात डाव्या चळवळीवर या धर्म विद्वेशी प्रवृत्तीचे हल्ले सुरु आहेत. संपूर्ण जगाला, ‘आरएसएस’सारख्या जातीय संघटना पासून सांस्कृतिक धोका निर्माण झालाय. याच प्रवृत्तींनी मनुस्मृतीचं समर्थन केले, इतिहासाचे विकृतीकरण केले आणि आता काळे कामगार कायदेही याच विचार धारेने, कष्ट कऱ्यांवर लादून देशातील ‘कामगार-चळवळ’ उध्वस्त करण्याची एकहाती मोहिम हाती घेतली आहे. ज्या कामगारांनी शंभर वर्षांपूर्वी संघर्ष करुन, कामगार हिताचे कायदे पदरात पडून घेतले, तेच कायदे आता काळ्या संहितेच्या स्वरुपात कामगारांच्या वाट्याला आलेत. आता, कोणाही कामगार संघटनेला संप पुकारता येणार नाही, आपल्या न्याय्य हक्कासाठी भांडता येणार नाही, रस्त्यावर लोकशाही मार्गाने आंदोलनं करता येणार नाहीत. देशातला शेतकरी व शेतमजूर संपवून, त्यांना शेती क्षेत्रातही भांडवली व्यवस्था रुजवायची असून, ती मोडून काढण्यासाठी आपण सर्वांनी प्राणपणाने संघर्ष करण्याशिवाय पर्याय नसल्याचे बाहेती म्हणाले. दरम्यान, आपल्या अध्यक्षीय भाषणात कामगार-नेते राजन राजे यांनी, आपल्या भावना अधिक परखडपणे व्यक्त केल्या. नारायण सुर्वे हे ‘कामगार-कवी’ होते, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कवितेला व्यवहारात उतरवले पाहिजे. नारायण सुर्वे यांना मर्यादित ठेवू नका, त्यांचे कार्य अमर्यादित आहे. शेकडो वर्षे गुलामगिरीत खितपत पडलेला कष्टकरी – बहुजनवर्ग नारायण सुर्वे यांनी आपल्या लिखाणातून जागृत केला. प्रस्थापित व्यवस्थेवर आसूड ओढत, त्यांनी खरा मार्क्सवाद मांडला. खरंतर सुर्वे यांना, कार्ल मार्क्स ची सुधारित आवृत्ती म्हटलं तरी ते वावगं ठरु नये, इतके प्रचंड उपकार त्यांनी आपल्यावर करुन ठेवलेत, फक्त नारायण सुर्वे यांचे विचार कडवट पणे रक्तात भिनवणे गरजेचे आहे. कालच २१ नोव्हेंबरला केंद्र सरकारने काळी कामगार संहिता देशभर लागू केलीय आणि आज आपण ‘कामगार-कवी’ असलेल्या नारायण सुर्वे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एकत्र आलोय. खरी म्हणजे हीच वेळ आहे की, आपण सर्वांनी एकत्र येत, या कामगार द्रोही कायद्याचा निषेध तर केलाच पाहिजे, त्याचबरोबर या फॅसिस्ट-शक्तीं विरोधात आंदोलनांच्या माध्यमातून लोकशाही आणि सनदशीर मार्गाने रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे. दरम्यान, या कवी-संमेलनाच्या निमित्ताने आपल्या कविता सादर करताना, कवी अरुण म्हात्रे आणि कवीयत्री प्रज्ञा दया पवार यांनी, ‘धर्मराज्य कामगार-कर्मचारी महासंघ’ या कामगार संघटनेने हुतात्मा स्मारकाच्या प्रति कृतीला अभिवादन करण्याचा जो काही उपक्रम केला, त्याचं जाहीर कौतुक करुन, ही अभिमानाची बाब असल्याचं ठळकपणे नमूद केलं. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो, कारण नारायण सुर्वे होते म्हणून आम्ही सर्व आहोत. आज त्यांचंच स्मरण करण्यासाठी आम्ही इथे जमलो आहोत, नारायण सुर्वे हे, नव्या युगाची नवी पहाट आहेत, अशा भावना कवी अरुण म्हात्रे यांनी यावेळी व्यक्त केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍड. नाना अहिरे यांनी केले तर, कार्यक्रमाचे प्रस्तावित ‘लाल बावटा निशाण पक्षा’चे ठाणे कार्याध्यक्ष उदय चौधरी यांनी केले. कार्यक्रमाची सांगता कॉ. अविनाश कदम यांनी डाव्या चळवळीचे क्रांती गीत गाऊन केली.




