कराड(विजया माने) : कराड शहर हे शैक्षणिक, वैद्यकीय, व्यापारी केंद्र आहे, तसेच या शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांना आपल्या कराड नगरपालिकेचा नगराध्यक्ष निवडून द्यायचा आहे. हा नगराध्यक्ष कसा असावा? त्याच्या विकासाच्या दृष्टिकोन काय आहे? त्याचे पुढील व्हिजन काय आहे? कराड शहराच्या समस्या व ते उपाय काय आहेत? ते विकासाच्या कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार आहेत? हे जाणून घेण्यासाठी सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजता शिवाजीनगर हाऊसिंग सोसायटी येथील छ. शिवाजी उद्यानाच्या शेजारील रस्त्यावर छ. शिवाजी उद्यान ग्रुपच्यावतीने नागरिकांच्या व पत्रकारांच्या समवेत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे चर्चासत्र आयोजित केलेले आहे. कराड शहर विकसित शहर असून कराड शहराच्या नागरी वसाहती झपाट्याने वाढत आहेत. कराड नगरपालिकेत नगराध्यक्ष निवडून जाऊन आपल्या शहराचा कारभार पाहणार आहेत. आपण आपल्या मतावर निवडून देणार नगराध्यक्ष हा कराड शहरात प्रथम नागरिक असणार आहे. निवडून येणारा नगराध्यक्ष हा सक्षम असावा ही आपल्या मतदारांची महत्त्वाची जबाबदारी आहे. अन्यथा निवडीनंतर पश्चात्तापाची वेळ येऊ नये. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे चर्चासत्राचे आयोजन केलेले आहे. सदरच्या चर्चासत्रात नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांना बोलविण्यात आलेले आहे.
तरी या कार्यक्रमासाठी कराड शहरातील नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक छत्रपती शिवाजी उद्यान ग्रुपतर्फे करण्यात आलेले आहे.




