ताज्या बातम्या

कोमसाप बोरिवली शाखेत ‘आनंदाचे डोही’

मुंबई : कोमसाप बोरिवली शाखा आयोजित श्री. चंद्रशेखर ठाकूर सर आणि सौ. तृप्ती सरदेसाई यांचा “आनंदाचे डोही” हा नितांत सुंदर कार्यक्रम अनेक साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत बोरिवलीतील रेल नगर येथे पार पडला. मोत्याच्या सरीत जागोजागी हिरे बसवावेत त्याप्रमाणे कार्यक्रमात ठिकठिकाणी पेरलेल्या कविता, गाणी आणि नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध करून गेले. दीड तासाचा वेळ कसा गेला कळलेच नाही.
कोमसाप बोरिवली शाखेतर्फे उत्सवमूर्तीना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. या मानपत्राचे लेखन ज्येष्ठ साहित्यिका अनुराधा नेरुरकर यांनी केले होते.
‘कार्यक्रमानंतर दोन्ही कलाकारांना चाहत्यांचा गराडा पडणे साहजिकच होते इतका सुंदर झाला कार्यक्रम झाला. किस्से, नाट्यनुभव, गाणी, कविता, असा वैविध्यपूर्ण मसाला असल्याने कार्यक्रम चटपटीत झाला. ‘पांडगो इलो रे बा इलो’ ही मालवणी फोडणी तर खमंगच होती. दीड तास एकदम भर्रकन गेला,’ अशी प्रतिक्रिया बोरिवली शाखेचे सदस्य आणि ज्येष्ठ कलावंत रामदास कामत यांनी व्यक्त केली.
कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. चंद्रशेखर ठाकूर सर आणि तृप्तीताई सरदेसाई यांनी तो अतिशय आत्मीयतेने समरसून सादर केला. असा, विविधतेने सजलेला, कुठेही कंटाळवाणा न करता, अतिशय अभ्यासपूर्वक आखलेला आणि प्रवाहीपणे सादर केलेला कार्यक्रम फार क्वचितच पाहायला मिळतो. सर्व श्रोते कार्यक्रमात रंगून गेले होते. सादरकर्ते आणि उपस्थित श्रोते या सर्वांचंच मनापासून अभिनंदन. मनात आनंद तरंग छेडणारा, ‘आनंदाचे डोही’ हा कार्यक्रम फारच सुंदर! अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ लेखिका आणि बोरिवली शाखेच्या माजी अध्यक्षा अनुराधा नेरुरकर यांनी दिली.
बोरिवली शाखेच्या सचिव कीर्ती पाटसकर यांनी आणि अन्य सदस्यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top