ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मॅरेथॉन प्रचार दौरा; अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे उसळला जनसागर

अक्कलकोट : नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या झंझावाती प्रचार दौऱ्याने अक्कलकोट, मोहोळ आणि सांगोला येथे प्रचंड जनसागर उसळला. शिवसेनेच्या धनुष्यबाणाभोवती निवडणूक फिरत असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे. प्रत्येक सभेला मिळालेला उस्फूर्त प्रतिसाद पाहता स्थानिकांसह कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे.

अक्कलकोट येथे झालेल्या सभेत ते म्हणाले, घरात बसून फुकटची पाटीलकी करत नाही आणि घरात बसून उंटावरून शेळ्या देखील हाकत नाही. आम्ही जनतेच्या सेवेसाठी थेट रस्त्यावर उतरतो. स्वामी समर्थांनी सांगितले आहे. आळशी माणसाचे तोंड पाहू नका, असा घणाघाती टोला शिवसेना प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

उमेदवार रईस टिनवाला आणि दुधनीतील उमेदवार प्रथमेश मेहेत्रे यांच्या पाठिंब्यासाठी बोलताना शिंदे म्हणाले की, “आम्ही जे बोलतो तेच करतो आणि जे करतो तेच बोलतो. लोकांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारी शिवसेना आहे.” त्यांनी विरोधकांवर टीका करत, “सरकार पडणार… सरकार पडणार… अशी जुनी रेकॉर्ड लावून विरोधक थकले, पण महायुती सरकार ठाम उभं आहे,” असा टोला लगावला.

अक्कलकोटला जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून उभारण्याचा संकल्प व्यक्त करत त्यांनी ७२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसह शहराच्या मूलभूत सुविधा, उद्याने, रस्ते आणि स्वच्छतेसाठी मंजूर निधीचा उल्लेख केला. लेक लाडकी, मोफत उच्च शिक्षण, मोफत एसटी प्रवास, किसान सन्मान योजना वाढ यांसह नागरिकांना मिळणाऱ्या योजनांची माहिती देताना उपस्थित नागरिकांनी घोषणाबाजी करत प्रतिसाद दिला.

यानंतर मोहोळमध्ये झालेली सभा निवडणुकीतील सर्वात प्रभावी सभांपैकी एक ठरली. सभेत जनतेने केलेल्या प्रतिसादाने वातावरण भारावले. येथे बोलताना शिंदे म्हणाले, “मोहोळमध्ये सुरू असलेली गुंडशाही मोडायची असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही.” शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सिद्धी वस्त्रे या सुशिक्षित, सक्षम आणि कणखर नेतृत्वाला पाठिंबा मिळाल्याची स्पष्ट चिन्हे सभेनंतर दिसून आली. शिंदे पुढे म्हणाले की, “लाडकी बहिण योजना बंद होणार अशी अफवा पसरवली जाते. पण तोपर्यंत ही योजना चालू राहील हे मी शब्द देतो.”

मोहोळसाठी मंजूर ३ हजार कोटींच्या विकास आराखड्याचा उल्लेख करत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा आणि शहर सुशोभीकरणासाठी केलेल्या कामांची आठवण करून दिली. सभेनंतर कार्यकर्त्यांनी उत्साहात “मोहोळमध्ये गुंडराज नाही — विकास हवा!” अशी घोषणाबाजी करत मोर्चा काढला.

सांगोल्यात झालेली सभा या दौऱ्याची शेवटची पण सर्वाधिक प्रभावशाली सभा ठरली. सभेत उसळलेल्या मानवी गर्दीने जणू निकाल आधीच जाहीर केला. या सभेत बोलताना शिंदे म्हणाले की, “या वेळेस सांगोल्यात धनुष्यबाणाशी कोणाचीही स्पर्धा नाही. दोन तारखेला मतदान आणि तीन तारखेला गुलाल — तोही शिवसेनेचाच उधळला जाईल.”

येथे शिवसेनेचे उमेदवार आनंद भाऊ माने यांचा उल्लेख करत त्यांनी सिंचन प्रकल्प, स्ट्रीट लाईट्स, प्रशासकीय इमारती, सुशोभीकरण आणि नागरिक सुविधा यांसाठी मंजूर प्रकल्पांची माहिती दिली. “सत्ता येते-जाते, पण नाव आणि काम कायम राहते. म्हणूनच लोक शिवसेनेवर विश्वास ठेवतात,” असे शिंदे म्हणाले.

सभांच्या शेवटी कार्यकर्त्यांना भावनिक संदेश देताना शिंदे म्हणाले, “मी आज उपमुख्यमंत्री आहे, पण आधी कार्यकर्ता होतो आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच राहणार आहे. आता प्रत्येक शिवसैनिकाने एकनाथ शिंदे बनून घराघरात जाऊन विकास पोहोचवा.”

या तिन्ही सभांतील वातावरण पाहता शिवसेनेच्या उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असून “शेवटचा बटण धनुष्यबाणावरच” असा जनतेचा सूर दिसून येत आहे. नगरपालिका निवडणुकीच्या टप्प्यात हा दौरा निर्णायक ठरल्याची चर्चा कार्यकर्त्यांत सुरू झाली आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top