नवी मुंबई : सध्या विविध समाज माध्यमांवर “महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण 2025” अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या निवासी मालमत्ता करात 30% सूट/सवलत मिळणार असल्याचा एक संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. सदर संदेशाची सत्यता तपासण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) कार्यक्षेत्रातील नागरिक दूरध्वनीद्वारे तसेच प्रशासकीय आणि विभाग कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात विचारणा करत आहेत.
तथापि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमामध्ये अशा प्रकारच्या मालमत्ता कर सवलतीसंदर्भात कोणतीही तरतूद नाही. याबाबत कोणतीही शासकीय योजना किंवा सवलत लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे सदरचा प्रसारित संदेश हा चुकीचा व नागरिकांची दिशाभूल करणारा आहे. नागरिकांनी या संदर्भात कोणत्याही अफवांना बळी पडू नये आणि अधिकृत माहितीसाठी केवळ नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत सूचनांवर विश्वास ठेवावा असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून करण्यात येत आहे.
असा आहे फसवणूक करणारा चुकीचा संदेश
महाराष्ट्रातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या स्वतः राहण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या निवासी मालमत्तेवर 30 टक्के मालमत्ता कर सवलत दिली जाते. ही मालमत्ता त्या ज्येष्ठ नागरिकाच्या नावावर (एकट्या किंवा पती-पत्नी संयुक्त नावाने) असावी आणि ती भाड्याने देण्यात आलेली किंवा व्यावसायिक वापरासाठी असू नये.
ही सवलत मिळविण्यासाठी अर्जदाराने स्थानिक महानगरपालिका किंवा नगरपरिषदेच्या कार्यालयात लेखी अर्ज सादर करावा. अर्जासोबत वयाचा पुरावा (आधार, पॅन, मतदार ओळखपत्र), मालकीचा पुरावा (मालमत्ता कार्ड, करार प्रत, सोसायटी शेअर प्रमाणपत्र) आणि स्वतः त्या घरात राहात असल्याचे स्वघोषणपत्र जोडावे.
ही सवलत महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये लागू आहे आणि आवश्यक अटी पूर्ण केल्यास व आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास ती सातत्याने मिळू शकते. तसेच ‘महाराष्ट्र गृहनिर्माण धोरण 2025’ अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या घरांसाठी वेगळी मुद्रांक शुल्क सवलत आणि इतर फायदे देखील उपलब्ध आहेत – असा चुकीचा संदेश सर्वत्र प्रसारित केला जात आहे.
तरी अशा प्रकारच्या चुकीच्या संदेशांवर व अफवांवर नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांनी विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी महानगरपालिकेचे संकेतस्थळ www.nmmc.gov.in तसेच फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम या समाज माध्यमांवरून प्रसारित होणाऱ्या अधिकृत संदेशांवर विश्वास ठेवावा असे आवाहन करण्यात येत आहे.




