मुंबई : अंबरनाथ येथील प्राचीन शिव मंदिर परिसरात असलेल्या अमरशक्ती मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते आणि कारगिलच्या ‘ऑपरेशन विजय’ मध्ये कामगिरी बजावलेले सेवानिवृत्त मेजर भानुदास तात्याभाऊ डुबे यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने अकाली निधन झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ४७ होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ, वहिनी, पुतणे, पुतणी असा मोठा परिवार आहे. भानुदास डुबे यांच्या अकाली निधनामुळे अंबरनाथ आणि परांजपे चाळ परिसरात शोककळा पसरली होती.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरी हे मूळ गांव असलेले भानुदास डुबे हे लहानपणापासून अंबरनाथ येथेच वास्तव्याला होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सैन्यात सेवा केली. कारगिलच्या ‘ऑपरेशन विजय ‘ मध्ये त्यांनी यशस्वी कामगिरी बजावली होती.
सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपला स्वतःचा व्यवसाय त्यांनी सुरू केला होता. व्यवसाय करतांनाच अमरशक्ती मंडळाच्या माध्यमातून त्यांची समाज सेवा सुरू होती. अतिशय अबोल पण मनमिळावू असा त्यांचा स्वभाव होता. त्यांच्या स्वभावामुळे परिसरातील सगळेच लोक त्यांच्याशी प्रेमाने वागत होते. त्यांच्या अंत्ययात्रेला परिसरातील नागरिकांप्रमाणेच शहरातील अनेक मान्यवर प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
सेवानिवृत्त सैनिकांनी भानुदास यांना अखेरची सलामी दिली त्यावेळी सर्वांचे डोळे पाणावले होते.




