कराड(प्रताप भणगे) : कराड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असताना राजकीय वातावरण तापले आहे. याच पार्श्वभूमीवर यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, माजी नगरसेवक हणमंतराव पवार व त्यांचे समर्थक यांनी आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट देत निवडणुकीसंदर्भातील चर्चा सुरू केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा निस्वार्थ सेवाभावी स्वभाव व स्वच्छ प्रतिमा यामुळे अनेक कार्यकर्ते आजही त्यांच्याशी भावनिकपणे जोडले गेले आहेत. दुसरीकडे विद्यमान भाजपाचे आमदार डॉ. अतुल भोसले यांनी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना भाजपमध्ये प्रवेश देत चव्हाण यांच्या विरोधात मोठी राजकीय चाल खेळली असे मानले जात आहे.
तरीदेखील मलकापूर नगरपरिषद व कराड नगरपरिषदेमधील पृथ्वीराज चव्हाण समर्थक व काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते पुन्हा एकत्र येत असल्याचे संकेत मिळत असून आगामी निवडणूक अत्यंत चुरशीची आणि रोचक होण्याची पूर्ण शक्यता निर्माण झाली आहे.
कराड शहरातील सध्याच्या हालचाली पाहता पुढील काही तासांत नवीन राजकीय समीकरणांची घोषणा होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.




