मुंबई : भाजप मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर केलेली टीका म्हणजे “भलत्याच घरचा राग आपल्याच लोकांवर काढणे” असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) चे प्रवक्ता व युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी दिली. स्वतःच्या अपयशावर पडदा टाकण्यासाठी आरोपांची धुरळवाफेकीची राजकीय शैली साटम साहेबांचा खास पवित्रा झाला असल्याची टीका त्यांनी केली.
मातेले म्हणाले की, साटम ठाकरे यांच्या 20 वर्षांवर प्रश्न उपस्थित करतात; परंतु महापालिकेत 20 वर्षे उपमहापौर भाजपचाच होता हे ते सोयीस्करपणे विसरतात. मागील चार वर्षांपासून प्रशासक राजमार्फत पालिकेवर भाजपचे नियंत्रण असूनही रस्ते, रुग्णालये, पाणीपुरवठा व शाळांचे प्रश्न कायम आहेत. “काम न करता नुसती टीका करण्याची कला म्हणजे साटम यांचे राजकारण” असा हल्लाबोल मातेले यांनी केला.
स्वतःच्या मतदारसंघातील कपूर हॉस्पिटलची दयनीय अवस्था असूनही त्यावर साटम शांत आहेत, अशी टीकादेखील त्यांनी केली. उद्धव–राज यांच्या भेटीमुळे भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण होते, म्हणूनच टीका केली जात असल्याचा आरोप मातेले यांनी केला. “इतरांवर बोट दाखवण्याआधी स्वतःच्या 20 वर्षांच्या उपमहापौरपदाचा व चार वर्षांच्या प्रशासक राजचा हिशोब द्या,” असे आव्हानही त्यांनी साटम यांना दिले.



