कराड(अजित जगताप) : सातारा जिल्ह्यातील विकास कामांपेक्षाही काकणभर सरस असलेल्या कराड नगरीचा नावलौकिक आहे. वाढत्या शहरीकरणामुळे महामार्गावर सहा पदरीकरण मार्ग केले आहेत. या ठिकाणी तासवडे टोल नाक्यात टोल वसुली जोमात पण, वाहतूक समस्या कोमात गेल्याची दिवसेंदिवस वाढ होत आहे.
सातारा – कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर सध्या सहा पदरीकरण मार्ग काम सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला वाहतूक वाढत असून वाहतूक नियंत्रण करणारे वाहतूक पोलीस अपुरे पडत आहे. जड व हलक्या प्रकारच्या वाहनांची गर्दी एकत्र नांदत असते. ज्या ठिकाणी अनाधिकृत टोल वसुली केली जाते. त्या ठिकाणी वाहतूक समस्या दीर्घकाळ वाढतात. तरीही टोल वसूल करणारे कर्मचारी व महामार्ग आणि स्थानिक वाहतूक पोलीस आपली जबाबदारी झटकत आहेत.
स्थानिक तसेच परराज्यातून आलेल्या बिचाऱ्या वाहन चालकांना टोल भरून सुद्धा सुविधा मिळत नाही. केंद्र व राज्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी हे भाजप सेना सत्ताधारी असल्यामुळे वाहन चालवणाऱ्या लोकांना व वाहन चालकांना पैसे देऊन विकतचे दुखणे सहन करावे लागत आहे. कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर भल्या मोठ्या वाहनाच्या रांगा लागून नियमितपणाने टोल भरणाऱ्या चालकांचा प्रवाशांना कोणती सुविधा मिळत नाही. वाहतुकीत अडकून पडल्यामुळे अनेक वाहन चालकांना या मार्गावरून जाणे म्हणजे खऱ्या अर्थाने मोदींचे अच्छे दिन याचा अनुभव घ्यावा लागत आहे. कितीही मोठ्या वल्गना केल्या तरी आम्ही सुधारणार नाही. आम्हाला सुधरावण्याचा प्रयत्न करू नका. असेच अघोषित सल्ला महामार्ग प्रशासन व टोल नाका वसुली ठेकेदार देत आहे. यामुळे वाहन चालकांच्या तिखट प्रतिक्रिया उमटत आहे.
काही अंतरापर्यंत जर नियमाप्रमाणे ट्रॅफिक जाम झाले तर टोल न भरता काही वाहने सोडल्यास अडथळा होणार नाही. असा नियम आहे. या नियमाची एखादी रुग्णवाहिका रस्त्यात अडकून पडली तरी अंमलबजावणी होत नाही.
सध्या कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर गुंडगिरी व ज्यांच्यावर केसेस आहेत. अशांची नेमणूक करण्याचा घाट घातला गेला आहे. अशा टोल नाक्यावर वर्तुणुकीचा दाखला पोलीस ठाण्यातून शक्तीने घेऊनच कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे गरजेचे बनले आहे.
राजकीय नेत्यांच्या वशिल्यांमुळे गुंडांची भरती झालेली आहे. या गुंडांना वाहतूक पोलीस व कराड सातारा व शहर पोलीस सुद्धा दबकून वागत असतात. राजकीय पक्षाचे पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी आणि पोलिसांची वाहने मोफत सोडत असल्याने त्यांना आपल्या कर्तव्यदक्षते पासून लांब राहावे लागते. परंतु, नेहमी टोल भरणारे व गरीब वाहन चालकांना त्याचा भरपूर त्रास सहन करावा लागतो. ते अशा वेळेला सक्षम व कर्तबदारीपासून वंचित असलेल्या यंत्रणेला शिव्या शाप देतात. यातील काही शाप लागत असले तरी काहींना त्याचे वाटत नाही. असे वाहन चालकांनी सांगितले. टोल वसुली सोबतच वाहन चालकांना सुविधा देण्याचे नियमाप्रमाणे काम झाल्यास कुणालाही त्रास सहन करावा लागणार नाही. तासवडी टोल नाक्याच्या गुंडगिरी व अकार्यक्षमतेबाबत अनेकदा प्रश्न निर्माण केले. याबाबत रस्ते विकास महामंडळ व आय आर बी कंपनीला सुद्धा आपण त्रास देण्यासाठी ठेका घेतलेला आहे. याची जाणीव होत आहे. हीच मोठी शोकांतिका आहे. शेवटी याबाबत नैसर्गिकरीत्या अन्याय करणारा वर सुद्धा एक दिवस कुऱ्हाड कोसळेल. अशी भावना वाहन चालक व्यक्त करत आहे. किमान याची तरी जाणीव ठेवावी. व वाहन चालकांशी सौजन्याने वागून त्यांच्याकडून नक्कीच टोल वसूल करावा.अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
___________________
चौकट– तासवडे टोल नाक्यावरच्या अन्यायाबाबत उंब्रज परिसरातील स्थानिक भूमिपुत्रांनी तीव्र आंदोलन केले होते. आता पुन्हा एकदा या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. हा रोष रस्ते विकास महामंडळ व आय.आर.बी. प्रशासनाच्या विरोधात आहे. याची जाणीव लोकप्रतिनिधींनी ठेवावी. असे स्पष्ट केले आहे. अनत्या या टोल नाक्याची तोडफोड झाल्यास त्याला पोलीस यंत्रणा जबाबदार राहील. असे काही भूमिपुत्रांनी नमूद केले आहे.
______________________
फोटो– कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर झालेली वाहनाची गर्दी.. (छाया — अजित जगताप कराड)




