ताज्या बातम्या

चर्मकार समाजाने निवडणुकीत एकजुटीची ताकद दाखवून द्यावी : माजी आमदार बाबुराव माने यांचे आवाहन

मुंबई — महानगरपालिकेसह राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होत आहेत. आता नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे . या सर्व निवडणुकांमध्ये चर्मकार समाजाने आपली एकजूट करून आपली ताकद ही मतांच्या स्वरूपातून दाखवून द्यावी असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार बाबुराव माने यांनी केले आहे. राष्ट्रीय चर्मकार संघाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नुकताच सायन येथील प्रिन्सिपल मनोहर जोशी कॉलेजच्या आवारात संपन्न झाला. त्यावेळी बोलताना माने यांनी हे आवाहन केले.
मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीत चर्मकार समाजाची ताकद ही फक्त वीस पंचवीस वॉर्ड मधून नव्हे तर सर्व 227 वार्ड मधून दिसली पाहिजे. प्रत्येक वॉर्ड मध्ये सुमारे 50,000 मतदार असून त्यापैकी पाच हजार मतदार हे आपले चर्मकार, मागासवर्गीय समाजाचे आहेत. यासाठी आपल्या वॉर्ड मधील लोकांच्या संपर्कात आपण असले पाहिजे. कोण कोठे राहतो, त्यांची नावे, पत्त्या सहित वार्ड अध्यक्षाला माहिती पाहिजे. यासाठी 227 वाॅर्ड मध्ये आपल्या राष्ट्रीय चर्मकार संघाच्या वार्ड अध्यक्षांची नियुक्ती झाली पाहिजे. आणि प्रत्येक वॉर्ड मध्ये राष्ट्रीय चर्मकार संघाचा झेंडा फडकला पाहिजे. संत रोहिदास आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लागले पाहिजेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करणाऱ्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले पाहिजे. डॉ.बाबासाहेबांचा समतेचा विचार पुढे नेणाऱ्यांना या निवडणुकीत पुढे आणले पाहिजे अशी अपेक्षाही माने यांनी व्यक्त केली.
*मोहोळच्या घटनेचा निषेध*
मोहोळ तालुक्यात चर्मकार समाजाच्या काही लोकांना जबरदस्त मारहाण करून त्यांना जात दांडग्यांनी रक्तबंबाळ केले. या घटनेत मारहाण झालेल्या चर्मकार समाजाच्या लोकांचे रक्ताळलेले कपडेही बाबुराव माने यांनी पोलीस स्टेशनमध्ये ठेवले. या मोहोळ घटनेचा तीव्र निषेध या सभेत बोलताना बाबुराव माने यांनी केला. तसेच कल्याण जवळ दिवामध्ये चर्मकार समाजाच्या एका मुलीने केलेली आत्महत्या ही अत्यंत दुर्दैवी घटना असून या घटनेमधील लोकांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी मागणी ही माने यांनी यावेळी केली.
शहर भागाचा अपवाद वगळता अजूनही ग्रामीण भागात चर्मकार समाज, मागासवर्गीय समाजावर धन व जात दांडग्याकडून होत असलेल्या अत्याचाराबद्दल माने यांनी तीव्र संताप व्यक्त केला. मोहोळमध्ये चर्मकार समाजाच्या लोकांना झालेल्या मारहाणीबाबतचे निवेदन राष्ट्रीय चर्मकार संघाने पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकांना सादर केलेले आहे . राष्ट्रीय चर्मकार संघाने प्रत्यक्ष मोहोळला भेट देऊन समाजातील लोकांना दिलासा देण्याचे काम केलेले आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय चर्मकार संघाने केलेल्या पाठपुरावामुळे मोहोळ घटनेत आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचे माने यांनी यावेळी सांगितले .
आपण इकडे मुंबई पुण्यात वास्तव्यात असल्याने आपल्या वडिलोपार्जित जमिनी, घरे, जागा यावर जात दांडगे ,धनजांडग्यांनी कब्जा करू नये यासाठी गावी पर्यटनास गेल्यासारखे गावी जाऊ नका.तर गावी गेल्यावर सात बारा आणि घर, जागेचा ग्रामपंचायतीचा दाखला अधून मधून काढत जा. नाहीतर धन व जातदांडगे केव्हा आपले घर ,जमीन बळकावतील त्याचा पत्ता लागणार नाही असा इशाराही बाबुराव माने यांनी दिला.

*जातीयवादाला निवडणुकीतून उत्तर द्या*
आपल्या समाजाचा एक नवरदेव घोड्यावर बसला आणि ही मिरवणूक एका ठाकूरच्या दारावरून गेली.अशी घटना मागे घडलेली आहे.या निर्दयी ठाकूरने नवरदेव व वरातीमधील लोकांना चोपले. आपण एकविसाव्या शतकाकडे प्रवास करीत असलो तरी अजूनही आपण घोड्यावर बसू शकत नाही ही आपल्या देशाची विदारक अवस्था असल्याचे बाबुराव माने यांनी यावेळी सांगितले. या जातीय वादाला रोखण्यासाठी आपल्या समाजाने एकजूट राखली पाहिजे .याला आपण निवडणूकीतून उत्तर दिले पाहिजे असे आव्हाने बाबुराव माने यांनी यावेळी केले.

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाविषयी जन जागृती करणे आवश्यक आहे.यासाठी राष्ट्रीय चर्मकार संघातर्फे संघाची विचारधारा, ध्येय, उद्दिष्टे आणि संविधान प्रशिक्षण जनजागृती कार्यक्रम चर्मकार संघाच्या कार्यकर्त्यांसाठी लवकरच आयोजित करण्यात येणार आहे,असे राष्ट्रीय चर्मकार संघाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष विलासराव गोरेगांवकर यांनी यावेळी सांगितले.
राष्ट्रीय चर्मकार संघ आगामी 2026 ची दिनदर्शिका प्रसिद्ध करणार असून यातून चर्मकार संघाची ध्येय, उद्दिष्टे व भूमिका ही लोकांसमोर जाण्यास मदत होणार असल्याचे राष्ट्रीय चर्मकार संघाचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष राम कदम यांनी सांगितले.तर ॲड कैलास अगावणे म्हणाले आंदोलने मोर्चे काढणे.आपल्या न्याय हक्कासाठी आवाज उठवणे यामुळे कोणावरही केस दाखल होत नाही.आणि याप्रकरणात राष्ट्रीय चर्मकार संघाच्या कोणत्याही सदस्यांवर केस दाखल झाली तरी घाबरु नका. आणि अशोक देहरे म्हणाले ग्रामीण भागात चर्मकार समाजावर अन्याय अत्याचार झाला, मारझोड झाली तर मोर्चा,आंदोलन हे आपल्या समाजाने केलेच पाहिजे.तरच जाणूनबुजून कानाडोळा करणारी यंत्रणा डोळे उघडील.
या कार्यकर्ता मेळाव्याचे सूत्रसंचालन गणेश खिलारे यांनी केले.
या कार्यकर्ता मेळाव्यास मिलिंद अगावणे, मनोहर शिंदे,अशोक देहरे,विजय खरात, मिलिंद खैरे, दिपक भोसले, विलास गोरेगांवकर, अ‍ॅड. कैलास आगवणे,राम कदम, हंसराज रेगर, जगन्नाथ खाडे,गणेश खिलारे, बाबासाहेब गायकवाड आदीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top