ताज्या बातम्या

साकीनाका जंक्शनवर खुलेआम ‘कालापिला’ जुगार; पत्रकाराला खुनाच्या धमक्या पोलिसांचा वरदहस्त असल्याचा गंभीर आरोप – स्थानिकांचा संताप

मुंबई : साकीनाका जंक्शन परिसरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या ‘कालापिला’ जुगारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून, या बेकायदेशीर धंद्यास स्थानिक पोलिसांचा वरदहस्त असल्याचा धक्कादायक आरोप पुढे आला आहे. पत्रकार प्रशांत बढे यांनी जुगाराचा व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना सरळ ‘मारून टाकू’ अशी धमकी देत सहा ते सात जणांनी दुचाकी अडवून हल्लाबोल केला.

प्रशांत बढे हे खाजगी कामानिमित्त मरोळ पासपोर्ट ऑफिसहून परतत असताना साकीनाका जंक्शनवरील घाटकोपरकडे जाणाऱ्या मार्गावरील पेट्रोल पंपाजवळील पदपथावर खुलेआम चालू असलेला जुगार अड्डा त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी मोबाईलने व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करताच जुगार चालक धावत येऊन त्यांच्यावर तुफान ओरडू लागले.
“व्हिडिओ डिलीट कर नाहीतर मर्डर करून टाकू!” अशी उघड धमकी देण्यात आली.

घटनास्थळाचा तातडीचा अहवाल देण्यासाठी बढे यांनी उपायुक्त परिमंडळ १० दत्ता नलावडे यांना फोन करून माहिती दिली. मात्र, त्याचवेळी आरोपींचा आक्रमक पवित्रा अधिक धोकादायक झाला. काही वेळाने आरोपी पळून गेले; परंतु त्यातील एक जण परत येऊन ‘हे राहील शेखचा धंदा आहे, त्याच्याशी पंगा घेऊ नका’ असे खुलेपणाने सांगू लागला.

याप्रकरणी बढे यांनी साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील यादव यांच्याशीही संपर्क साधला.
ऑर्डरलीकडून “साहेब मिटिंगमध्ये आहेत, पोलिस पाठवले आहेत” अशी माहिती देण्यात आली.
बढे दीर्घकाळ पोलीस मदतीची वाट पाहत उभे राहिले; तरीही कोणतीही मदत वेळेत पोहोचली नाही. परिस्थिती अतिशय धोकादायक झाल्याने त्यांना जागा सोडावी लागली. दहा ते पंधरा मिनिटांनी पीएसआय अजित लोणकर यांनी घटनास्थळाची विचारणा केली; पण तत्पूर्वी पत्रकार सुरक्षित अंतरावर गेले होते.

घटनास्थळाजवळील फेरीवाले व दुकानदारांच्या मते,
“इथे रोजच हा जुगार चालतो. लोकांना खुलेआम लुटले जाते. पोलिसांकडे तक्रार केली की दोन दिवस अड्डा बंद होतो आणि पुन्हा काही अंतरावर सुरू होतो. पोलिसांच्याच वरदहस्ताशिवाय हे थांबूच शकत नाही.”

या सर्व प्रकारामुळे पत्रकार व नागरिकांमध्ये संताप उसळला असून, खुलेआम जुगार चालवणाऱ्या टोळीवर कठोर गुन्हेगारी कारवाई, पत्रकाराला धमकी देणाऱ्यांची ओळख पटवून अटक,आणि वेळेत पोलीस न पोहोचल्याबद्दल जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

प्रशांत बढे यांनी मुख्यमंत्री, गृहविभाग व मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करत स्पष्ट प्रश्न उपस्थित केला आहे, “सामान्य नागरिकांची लूट करणारा हा जुगार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? आणि पोलिस मदत वेळेत आली नाही याचे उत्तर कोण देणार?”

साकीनाका परिसरातील बिनधास्त जुगारजाळे आणि पोलिसांच्या कारवाईअभावी कायद्याची पायमल्ली होत असल्याचे चित्र या घटनेतून पुन्हा उघड झाले आहे.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top