ताज्या बातम्या

मुंबई महानगरपालिका निवडणूक : काँग्रेस–राष्ट्रवादी आघाडीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात – वर्षा गायकवाड

प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणूक लोकशाही आणि संविधानवादी विचारसरणी असलेल्या पक्षांना एकत्र घेऊन लढवण्याचा काँग्रेस पक्षाचा प्रयत्न असून, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नैसर्गिक आघाडी लवकरच अंतिम स्वरूप धारण करेल, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

मुंबई काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आज सिल्व्हर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेऊन बीएमसी निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या. या शिष्टमंडळात खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री आमदार अस्लम शेख, आमदार अमीन पटेल, आमदार ज्योती गायकवाड, जिल्हा अध्यक्ष रवि बावकर आदींचा समावेश होता.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या,
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आघाडी व्हावी ही काँग्रेसची अपेक्षा आहे. राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्ष राखी जाधव यांच्यासह इतर नेत्यांशी प्राथमिक चर्चा झाली असून, दोन्ही पक्षांच्या पुढील बैठकीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.”

मनसेच्या संभाव्य सहभागाबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्या म्हणाल्या,
“शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वीच स्वबळावर लढण्याची भूमिका मांडली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन भाऊ एकत्र आले तर त्याचे स्वागतच आहे, परंतु त्याबाबत काँग्रेसशी कोणतीही चर्चा झालेली नाही. काँग्रेस नेहमी समविचारी व लोकशाहीवादी पक्षांशीच आघाडी करते.”

मुंबईच्या विकासात सर्व प्रांतांतील आणि सर्व समाजघटकांचे योगदान असल्याचे सांगत त्या पुढे म्हणाल्या,
“कायदा हातात घेणारे किंवा दडपशाही करणाऱ्यांबरोबर काँग्रेस जाऊ शकत नाही. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेतून देशाला प्रेम आणि एकता देण्याचे काम केले आहे.”

महानगरपालिकेची निवडणूक मुंबईच्या वास्तव प्रश्नांवर लढली जावी, असे मत व्यक्त करत त्यांनी मुंबईतील प्रदूषण, रस्त्यांवरील खड्डे, वाहतूक कोंडी, पाणीपुरवठा, आरोग्य सेवा, शिक्षण आणि बीएमसीमधील भ्रष्टाचार हे मुद्दे आगामी निवडणुकीत केंद्रस्थानी असतील, असेही स्पष्ट केले.

📢 जाहिरात सूचना
व्यावसायिक आणि वैयक्तिक जाहिरातीसाठी संपर्क करा
९२२१११७६८४
💬 WhatsApp वर संपर्क करा
Scroll to Top