नवी मुंबई : समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण कमीत कमी कालावधीत जलद शोधून त्यांना उपचाराखाली आणणे व कुष्ठरोगाबाबत समाजात जनजागृती करणे या उद्देशाने केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दि. 17 नोव्हेंबर ते 02 डिसेंबर 2025 या कालावधीत “कुष्ठरुग्ण शोध अभियान” ही मोहीम नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात राबविण्यात येत आहे.
ही मोहीम आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली 182 पथकांच्या माध्यमातून 76,126 घरातील 3,41,339 लोकसंख्येला भेटी देण्यात येउुन नागरिकांची तपासणी व जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक पथक दररोज 30 घरांना प्रभावीपणे भेट देऊन माहिती संकलीत करेल अशाप्रकारे पथके तयार करण्यात आली आहेत.
प्रत्येक पथकामध्ये एक महिला व एक पुरुष कर्मचारी असणार आहे. प्रत्येक घरातील महिलांची तपासणी महिला कर्मचाऱ्यांमार्फत आणि पुरुषांची तपासणी पुरुष कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात येणार आहे. कुष्ठरोगाकरिता त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड व बधीर तेलकट/चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयांचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद न करता न येणे अशा प्रकारची लक्षणे विचारुन तपासणी केली जाणार आहे. यामध्ये कुष्ठरोगाची लक्षणे आढळल्यानंतर वैदयकिय अधिकारी यांच्याकडे निदानाकरीता संदर्भित करण्यात येणार आहे.
नमुंमपा कार्यक्षेत्रात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तपासणी कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली असून यामध्ये झोपडपट्टी, बांधकाम मजूर, दगडखाणी इ. भागाचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार 3,41,339 लोकसंख्येमध्ये 182 पथकांद्वारे मोहीम कालावधीत भेटी देण्यात येणार आहेत.
या अभियानामुळे समाजातील निदान न झालेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर शोधून त्यांना त्वरित बहुविध औषधोपचाराखाली आणणे, नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधून बहुविध औषधोपचाराद्वारे संसर्गाची साखळी खंडित करून होणारा प्रसार कमी करणे, कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करून कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हे उद्दीष्ट साध्य करण्यात येणार आहे.
सदर मोहीमेमध्ये नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देऊन स्वतःची कुष्ठरोगाबाबत तपासणी करुन घ्यावी व उद्दीष्ट साध्य करण्यात सहकार्य करावे असे आवाहन नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.




