कराड(विजया माने) : मलकापूर नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यात नगराध्यक्ष पदासाठी १ व नगरसेवक पदांसाठी १५ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कपिल जगताप व ज्ञानदेव साळुंखे यांनी दिली.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. १३ रोजी एकूण १६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खांदे समर्थक, मलकापूरचे माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, त्यांनी अध्याप भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला नसला, तरी त्यांचा भाजपकडून अर्ज भरल्याने त्यांचा प्रवेश निश्चित झाला आहे. आज होणाऱ्या मेळाव्यात याची अधिकृत घोषणा होईल. अर्ज भरताना त्यांच्यासोबत माजी नगराध्यक्षा नीलम येडगे यांच्यासह त्यांना मानणारे आजी-माजी नगरसेवक, नगरसेविकाही उपस्थित होत्या. त्यामुळे मनोहर शिंदे यांच्यासह त्यांचे समर्थकही आज गुरुवारी सायंकाळी मलकापुरात होणाऱ्या भाजप पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, गुरुवारी सकाळी भारतीय जनता पार्टीकडून नगराध्यक्षपदासाठी सुनंदा तानाजी साठे यांनी, तर नगरसेवक पदासाठी विविध प्रभागांमधून पुढीलप्रमाणे अर्ज दाखल झाले आहेत.
यामध्ये
प्रभाग १ : सर्वसाधारण जागेसाठी नितीन (उर्फ नारायण) विष्णुपंत काशीद-पाटील (अपक्ष) व शहाजी आनंदराव पाटील (भाजप),
प्रभाग २ : सर्वसाधारण महिला जागेसाठी गीतांजली शहाजी पाटील (भाजप), तर सर्वसाधारण जागेसाठी विक्रम अशोक चव्हाण (भाजप), प्रभाग ३ : सर्वसाधारण महिला जागेसाठी रंजना अशोक पाचुंदकर
(भाजप), प्रभाग ४ : अनुसूचित जाती जागेसाठी सचिन संपत खैरे (भाजप), तर सर्वसाधारण महिला जागेसाठी कल्पना नारायण रैनाक (भाजप),
प्रभाग ५ : सर्वसाधारण जागेसाठी मधुकर महादेव शेलार (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष), तसेच तानाजीराव संभाजी देशमुख आणि राजेंद्र प्रल्हाद यादव (भाजप),
प्रभाग ७ : सर्वसाधारण जागेसाठी संभाजी मारुती रैनाक (भाजप),
प्रभाग ८ : अनुसूचित जाती महिला राखीव जागेसाठी गीता नंदकुमार साठे (भाजप),
प्रभाग १० : नागरिकांच्या मागास प्रवर्ग जागेसाठी वसीम शब्बीर मुल्ला (भाजप) तसेच
प्रभाग ११ : सर्वसाधारण महिला जागेसाठी राजश्री नितीन जगताप, तर सर्वसाधारण जागेसाठी मनोहर भास्करराव शिंदे (दोघेही भाजप) यांनी आपले उदेम्वारी अर्ज दाखल केले.




