मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) : प्रगत सिंधुदुर्ग मुंबई, या मंडळाची वार्षिक सभा, मंडळाचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली, हेटकरी भंडारी मंडळ दादर पश्चिम येथे मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी घेण्यात आली.
सभेच्या सुरुवातीस संस्थेच्या माध्यमातून दयानंद चौधरी यांनी ज्या चाकरमान्यांची विविध कामे, मग ती जमिनीची असतील, वारस तपासाची असतील, शासकीय कार्यालयातून विविध दाखले मिळण्यासाठी येणाऱ्या अडचणी असतील,जात दाखला मिळण्याबाबत असेल,भाड्याने दिलेली घरे केअरटेकर यांनी आपल्या नावाने करून घेतलेली असतील, अशी विविध कामे मार्गी लावल्याबाबत, सुरेश पांचाळ, महादेव लाड, अनिल तांडेल, प्रमोद राणे,एड.आरती गवंडे, सुविधा गोवेकर, कादंबरी गवंडे, शैलेश धुरी, व इतर चाकरमान्यांनी त्यांच्या झालेल्या कामाबाबत आपले मनोगत व्यक्त केले व संस्थेचे आभार मानले.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये फिरून तरुणांना आय.ए.एस,/आय.पी.एस./ यू.पी.एस.सी. चे परीक्षेबाबत मोफत मार्गदर्शन करणारे सत्यवान रेडकर यांनी, प्रगत सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून मुंबईत असो वा सिंधुदुर्गमध्ये असो, अशा प्रकारची मार्गदर्शन शिबीरे घेतली जात असतील, तर त्याना मोफत मार्गदर्शन करण्याकरिता आपण केव्हाही तयार असल्याचं सांगितलं.
जॉन्सन लिफ्ट कंपनीचे फायनान्स ऑफिसर सूर्यकांत बागवे,यांनी आपल्या भाषणात आय.टी.आय.पास, इलेक्ट्रिकल मेकॅनिकल डिप्लोमा धारक,जर तरुण असतील तर त्यांना आपल्या कंपनीमध्ये खात्रीने नोकरी देण्याकरीता आश्वासित केले.
संस्थेचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात २०१६ रोजी या संस्थेची स्थापना झाल्यापासून आजपर्यंतच्या (९ नोव्हेंबर २०२५)कार्याचा आढावा घेतला, हा आढावा घेताना, काम करण्याकरिता सिंधुदुर्गच्या स्थानिक प्रशासनाकडून कशा प्रकारे अडचणी निर्माण केल्या जातात, व स्थानिक राजकीय पुढारी, लोकप्रतिनिधी, यांच्याकडूनही चाकरमान्यांच्या योग्य प्रकरणाला न्याय देताना कसा असहकार केला जातो, याची अनेक उदाहरणे दिली. शेवटी न्याय मिळविण्याकरिता कोकण आयुक्तांपर्यंत जावं लागतं, याकरिता प्रकरणांना न्याय देताना चार चार पाच पाच वर्षे वाट बघावी लागते. फक्त निवडणुकांच्या वेळी या लोकप्रतिनिधींना मुंबईच्या चाकरमान्यांची आठवण होते.
संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला, त्यामध्ये शेतकरी मेळावे असतील, महिला बचतगट मिळावे असतील, वैद्यकीय शिबीरे असतील, वृद्धाश्रमांना केलेली मदत असेल, आदिवासी शाळांना केलेली मदत असेल, कोरोनाच्या काळात विविध शासकीय कार्यालयांना, संस्थेने स्वतः बनविलेल्या सॅनिटायझर मशीनस, सॅनिटायझर, सी विटामिन टॅबलेटस, नेब्युलायझर, कुडाळच्या महिला रुग्णालयास दिलेल्या पाच हजार फेरोवीन व्हिटेमीन्स टॅबलेटस, रुंगणांना केलेली आर्थिक मदत, सावंतवाडी तालुक्यातील कळणे, बांद्यातील शेरले, कुडाळमधील चेंदवण, वालावलं, सरंबळ, कुडाळ समता नगर, वैभववाडीतील उंबर्डे, व ईतर गावातील पूरग्रस्थांना,केलेली मदत. भविष्यातही संस्थेच्या माध्यमातून हे काम असेच अविरत चालू राहील याची ग्वाही चौधरी यांनी सभेस दिली.
ही सामाजिक कामे करीत असताना संस्थेचा आर्थिक पाया मजबूत असावा लागतो. याकरिता मुंबईमध्ये एखादा कार्यक्रम घेऊन त्या माध्यमातून आर्थिक मदत जमा करण्याकरिता संस्था उपसचिव सतीश दळवी यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती स्थापना करण्यात आली.
सभेस घाडीगावकर समाजाचे अध्यक्ष मेघश्याम घाडीगावकर,एअर इंडिया लोकाधिकार समितीचे प्रशांत सावंत, हेटकरी भंडारी समाजाचे कार्यकारी मंडळ सदस्य भाई मांजरेकर, व अन्य मान्यवरानी मार्गदर्शन केले. सभेचे प्रास्ताविक संस्था उपसचिव सतेज दळवी यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वतः अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता संतोष नाईक, सुरेश रंजन राऊळ,दिनकर परब, पांडुरंग गावडे, दीपक सरनोबत, महादेव लाड, देविदास सावंत, संभाजी मुणगेकर, अनिकेत रेवणकर, नंदकिशोर कांबळी, तुषार कांबळी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
प्रगत सिंधुदुर्ग मुंबई मंडळाची वार्षिक सभा मुंबई येथे संपन्न
RELATED ARTICLES
