जेजुरी : पुण्यश्लोक अहिल्यादेवी विद्या मंदिर आणि ए.सी. हुंडेकरी ज्युनिअर कॉलेज, जेजुरी येथे आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या माध्यमातून आयोजित तीन दिवसीय “मेधा योगा अभ्यास शिबिरा”चा समारोप शनिवार (ता. ८ नोव्हेंबर) रोजी उत्साहात झाला.
विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक व भावनिक विकासासाठी या शिबिरात विविध उपक्रम राबविण्यात आले. प्राचार्य हेमंत बगनर आणि आर्ट ऑफ लिविंग मुंबईचे प्रशिक्षक संग्राम जाधव यांच्या पुढाकारातून हे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांसाठी स्मरणशक्ती वाढविणे, अभ्यासाची आवड निर्माण करणे, पालक-विद्यार्थी संवाद दृढ करणे, मनाची एकाग्रता साधणे व विचारांना सकारात्मक दिशा देणे या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.
आर्ट ऑफ लिविंग संस्थेच्या वरिष्ठ प्रशिक्षक रेश्मा परब व तेजल कोठारी यांनी विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार, प्राणायाम आणि विविध योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवत योग्य जीवनशैलीचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या शेवटी विभाग प्रमुख नारायणकर सर यांच्या उपस्थितीत गायकवाड मॅडम व दीक्षित मॅडम यांच्या हस्ते प्रशिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य बगनर सर, विभाग प्रमुख वाबळे सर, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले.
“द आर्ट ऑफ लिविंग” संस्थेचे संस्थापक प.पू. श्री श्री रविशंकरजी यांनी विद्यार्थ्यांसाठी रचलेला हा कोर्स “मुलांसाठी नवजीवन देणारा आणि उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवणारा” ठरल्याचे प्राचार्य व शिक्षकांनी नमूद केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, आनंद आणि सकारात्मकतेचा नवा उत्साह निर्माण झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळाले.
