घाटकोपर : घाटकोपरवासीयांसाठी महत्त्वाचा असलेला सर्वोदय एसटी स्टँड स्थलांतर करण्याचा प्रयत्न अखेर नागरिकांच्या रोषामुळे थांबविण्यात आला आहे. मागील हॉस्पिटलच्या मालकाने या स्टँडचे स्थलांतर करण्याचा डाव आखला होता, मात्र यामागील संपूर्ण पार्श्वभूमी न कळल्याने पालिका अधिकाऱ्यांनी अनवधानाने परवानगी दिली होती.
याच हॉस्पिटल मालकाच्या विरोधामुळे काही वर्षांपूर्वी पालिकेने तत्कालीन स्टँड तोडला होता, आणि नंतर घाटकोपर प्रगती मंच, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या सातत्यपूर्ण आंदोलनानंतर हा स्टँड पुन्हा उभा राहिला. त्यामुळे हा स्टँड आता घाटकोपरवासीयांच्या भावनांशी निगडित झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी आणि प्रगती मंचच्या सदस्यांनी या स्टँडला कुठेही हलवू नये अशी ठाम मागणी केली असून, “जर स्टँड हलविण्याचा प्रयत्न झाला, तर मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. नागरिकांच्या या तक्रारीनंतर सहायक आयुक्तांनी तत्काळ काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, फक्त काम थांबवून न चालता, नव्याने उभारलेला स्टँड त्वरित निष्कासित करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिक पत्रकार प्रशांत बढे यांच्या फेसबुक पोस्टवरून ही बाब उघड झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र येत प्रशासनाचे लक्ष वेधले. परिणामी, काम थांबवण्यात आले असून, हा ‘पहिला छोटा विजय’ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
