मुंबई : मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) स्थानकावर संध्याकाळी अचानक रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केल्याने मुंबईकरांचे हाल झाले. NRUM संघटनेच्या नेतृत्वाखाली मोटरमन आणि रेल्वे कर्मचारी यांनी हे आंदोलन सुरु केले. संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांनी सुरू झालेल्या या आंदोलनामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली.
मोटरमनही आंदोलनात सहभागी झाल्याने अनेक लोकल गाड्या स्थानकावरच थांबल्या. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱ्या हजारो प्रवाशांना स्थानकांवर अडकून पडावे लागले. सीएसएमटी स्थानकाच्या आत व बाहेर प्रचंड गर्दी उसळली होती.
माहितीनुसार, मुंब्रा अपघात प्रकरणात अभियंत्यांवर दाखल झालेल्या जीआरपीच्या गुन्ह्यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी रेल्वे प्रशासन आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा झाल्यानंतर अखेर आंदोलन मागे घेण्यात आले.
मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला यांनी सांगितले की, “साधारण ४५ ते ५० मिनिटे आंदोलन सुरु होते. त्यानंतर चर्चा होऊन लोकल सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. मात्र, काही गाड्या उशिराने धावत आहेत.”
या अचानक आंदोलनामुळे एक तास मुंबईकर चाकरमान्यांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला.
