प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला तर काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी इच्छुकांनी गर्दी केलेली आहे. इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेसने अर्ज मागविले असून आतापर्यंत ११५० पेक्षा अधिक अर्ज गेले आहेत. मुंबईतील सहाही जिल्ह्यातून इच्छुक उमेदवारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून लवकरच महापालिकेसाठी आरक्षण सोडत जाहीर होणार असल्याने अर्जास मुदतवाढ दिली जाणार आहे असे मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली तयारी सुरु असून २२७ वॉर्डासाठी इन्चार्ज नियुक्त केले असून त्यांच्या माध्यमातून सर्व वॉर्डात बैठकांचे सत्र सुरु आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवावी अशी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि त्याच भूमिकेतून कार्यकर्ते कामाला लागले आहेत. परंतु एकत्र लढायचे की आघाडी करायची यासंदर्भात अजून निर्णय झालेला नाही, यासंदर्भात दिल्लीतील पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील परंतु मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षाताई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सर्व नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते जोरदार तयारीला लागले आहेत असेही सुरेशचंद्र राजहंस म्हणाले.
