मुंबई (समीर खाडिलकर /शांताराम गुडेकर) : सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित कार्यक्रमात कोकण एनजीओ इंडिया तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आयएएस श्रीमती त्रुप्ती धोडमिसे यांना प्रतिष्ठेचा ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पद्मश्री परशुराम गंगावणे आणि कोकण एनजीओ इंडियाचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या कार्यक्रमाला व्यवस्थापक प्रथमेश सावंत, देवानंद कुबल, गौरी अडेलकर, समीर शिर्के, वैष्णवी म्हाडगूत, शशिकांत कसले, अवंती गवस, रुचा पेडणेकर, अमोल गुरम आणि पद्माकर शेटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भावना व्यक्त करताना आयएएस त्रुप्ती धोडमिसे म्हणाल्या,”कोकण संस्थेचा ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ हा सन्मान मिळणं माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि भावनिक बाब आहे. माझ्या प्रवासात आलेल्या संघर्षांना आणि प्रत्येक टप्प्यावर दिलेल्या परीक्षांना या पुरस्काराच्या रूपाने मिळालेली दाद, ही माझ्या केवळ वैयक्तिक नव्हे, तर संपूर्ण समाजाच्या प्रेरणेची कहाणी आहे.”त्या पुढे म्हणाल्या,”मी चौथ्या प्रयत्नात आयएएस झाले, पण त्या मागे असंख्य अपयश, निराशा, आत्मपरीक्षण आणि न थांबता चालणारी मेहनत होती. आजच्या तरुणांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी – अपयश हे यशाचं पहिले पाऊल आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, तुमचं ध्येय ठरवा आणि त्यासाठी झपाटून काम करा. पेटून उठा, ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका.”
या सन्मानाबद्दल पद्मश्री परशुराम गंगावणे यांनी त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, त्रुप्ती धोडमिसे यांचा प्रवास हा सर्व युवकांसाठी प्रेरणादायी आहे. विशेषतः जे विद्यार्थी एमपीएससी आणि युपीएससी परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी त्यांची वाटचाल ही एक उज्ज्वल आदर्श ठरेल.
श्रीमती त्रुप्ती धोडमिसे यांनी या प्रसंगी कोकण एनजीओ इंडिया संस्था गेल्या १४ वर्षांपासून समाजाच्या उन्नतीसाठी करत असलेल्या कार्याचं विशेष कौतुक केलं आणि या कार्यात सातत्य राहो, अशी सदिच्छा व्यक्त केली.
युवांसाठी प्रेरणादाई असलेल्या श्रीमती आयएएस त्रुप्ती धोडमिसे ‘युथ आयकॉन अवॉर्ड २०२५’ ने सन्मानित
RELATED ARTICLES
